श्रीरामपूर – श्रीरामपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्ष निवडीतील नाराजीचे पडसाद बॅनरबाजीच्या माध्यमातून उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हकालपट्टी झालेल्यांनीच बॅनरबाजी करून पक्षात गोंधळ उडवण्याचा प्रयत्न केला आहे, असा स्पष्ट आरोप राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शिर्डी येथे आयोजित ‘संघटन पर्व गाव बस्ती संपर्क अभियान’ आढावा बैठकीत बोलताना मंत्री विखे पाटील यांनी नाराज व्यक्तींवर घणाघाती टीका केली. “ज्यांची हकालपट्टी झाली आहे, त्यांनीच बॅनरबाजी केली आहे. आम्ही त्यांना फारसे महत्त्व देत नाही. जे कायमच असंतुष्ट राहिले, त्यांना आम्ही कधीच संतुष्ट करू शकत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, “जिल्हाभरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वसहमतीने पार पडल्या आहेत. काही मोजक्या असंतुष्टांनी बॅनरबाजी करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
”या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण होते. यावेळी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे, राज्य संघटन मंत्री रवींद्र अनासपूरे, विक्रम पाटील, विजयराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीला राजेंद्र गोंदकर, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, नितीन कापसे, राहाता तालुकाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, शिर्डी शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर, सचिन तांबे, किरण बोऱ्हाडे, अशोक पवार, योगेश गोंदकर, लखन बेलदार, गणेश सोनवणे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
दरम्यान, राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर झाला आहे. यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांचा नुकताच आढावा घेण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांत पाणीसाठा समाधानकारक आहे.” “यंदा काटेकोर पाणी नियोजन करण्यात आले असून, पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. जलाशयांतील अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेतली जात आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.