श्रीरामपूर/प्रतिनिधी :- नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये सुरू असलेल्या आयुष्यमान भारत दवाखान्याविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. दवाखाना तत्काळ शाळेतून हलवावा, अन्यथा बुधवारी या दवाखान्याला कुलूप लावू, असा इशारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी दिला आहे. श्रीरामपूर नगरपालिकेच्या एकूण नऊ शाळांपैकी मोरगे वस्ती, सरस्वती कॉलनी आणि गोधवणी या तीन शाळांमध्ये सध्या आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य सेवा केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, याच पालिकेच्या तीन उर्दू शाळांमध्ये कोणतेही दवाखाने सुरू करण्यात आलेले नाहीत, ही बाब पक्षपाती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागराजे, तालुका आरोग्य अधिकारी शिंदे, तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप दवाखाना शाळेतून हलवण्यात आलेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या प्रतिष्ठानने आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अमित मुथा यांनी सांगितले की, “शाळांमध्ये आरोग्य केंद्र सुरू ठेवणे योग्य नाही. यामुळे शाळेच्या परिसरात बाहेरील लोकांची सतत वर्दळ होते, परिणामी विद्यार्थी व पालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यातही एकतर्फीपणे फक्त हिंदू वस्त्यांतील शाळांमध्ये दवाखाने सुरू ठेवले जातात आणि उर्दू शाळांकडे दुर्लक्ष होते, ही बाब भेदभावपूर्ण आहे. तसेच, याआधीही श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात शिक पाव अन्नातून विषबाधा होऊन अनेक नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणावरून प्रशासनाची गंभीर दुर्लक्षाची पद्धत स्पष्ट होते, असा आरोप प्रतिष्ठानने केला. नगरपालिकेकडे इंदिरा गांधी मंगल कार्यालय, गोविंदराव आदिक सभागृह, मटण मार्केटजवळील जागा, आगाशे सभागृह, ओपन थिएटर अशा अनेक मोकळ्या व सार्वजनिक ठिकाणी दवाखाना सुरु करण्याचा पर्याय असतानाही, केवळ शाळांमध्येच हे केंद्र सुरू ठेवले जात असल्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर तीन दिवसांत (म्हणजे मंगळवारपर्यंत) आयुष्यमान भारत दवाखाना शाळांमधून हलवण्यात आला नाही, तर बुधवारी संबंधित दवाखान्यावर कुलूप ठोकण्यात येईल. या निर्णयामुळे प्रशासनाची झोप उडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीरे यांनी प्रतिष्ठानचे निवेदन स्वीकारले असून, पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडे ते पाठवले जाईल, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, शहरात या मुद्द्यावरुन चर्चा सुरू झाली असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासोबतच आरोग्य सेवा कशी संतुलित ठेवता येईल याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.