Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम – सर्वपक्षीय इच्छुकांची वाढती गर्दी, प्रचाराला अल्प...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम – सर्वपक्षीय इच्छुकांची वाढती गर्दी, प्रचाराला अल्प वेळ

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या चार महिन्यांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्यात असा स्पष्ट आदेश दिला आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. अल्प वेळेत तयारी करावी लागणार असल्याने राजकीय वातावरण तापले असून इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, ज्यांना पूर्वी गल्लीतही कोणी विचारत नव्हते, असे अनेकजण आता निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक झाले आहेत. पक्षाने तिकीट दिले नाही, तरी अपक्ष उमेदवारीचा पर्याय घेण्यासाठीही अनेकांची तयारी सुरू आहे. त्यामुळे तिकीट वाटप ही सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवाय, काही नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चाही श्रीरामपूर परिसरात रंगू लागल्या आहेत.

राजकीय इच्छुकांची गर्दी केवळ श्रीरामपूर किंवा नगर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण राज्यातच हेच चित्र दिसून येत आहे. प्रत्येक वार्डात कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून, कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, मतदारराजा अत्यंत जागरूक असून कोणत्या नगरसेवकाने मागील पंचवार्षिकात काय काम केले, याची संपूर्ण माहिती मतदारांच्या ‘कुंडली’त असते.

आजचा मतदार हा केवळ घोषणांवर किंवा पैशांवर विश्वास ठेवत नाही, तर विकासकामे करणाऱ्यांनाच पसंती देतो. त्यामुळे ‘काम करा आणि निवडून या’ हा नवा पायंडा स्पष्टपणे दिसून येत आहे. श्रीरामपूर सारखे महत्त्वाचे नगरपालिका क्षेत्र विकासाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असून, येथे अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीरामपूरातील करण ससाणे यांचे गेल्या काही वर्षातील कार्य, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची कार्यशैली आणि वाढती लोकप्रियता यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत नवा उत्साह संचारलेला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार असले तरी, जनतेचा संदेश मात्र स्पष्ट आहे – “काम करणाऱ्यांनाच संधी!”

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
24.7 ° C
24.7 °
24.7 °
91 %
2.6kmh
57 %
Thu
31 °
Fri
27 °
Sat
26 °
Sun
30 °
Mon
31 °

Most Popular

error: Content is protected !!