Homeमहाराष्ट्रशिर्डीसोशल मीडियावरील एका संदेशावर काही तासांत शिर्डी ग्रामस्थांचा ‘साईसेवा’ उपक्रम

सोशल मीडियावरील एका संदेशावर काही तासांत शिर्डी ग्रामस्थांचा ‘साईसेवा’ उपक्रम

ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना पाच लाखांची मदत

शिर्डी (प्रतिनिधी) :- साईबाबांच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा “दान देणाऱ्याचा हात नेहमी वरचाच असतो” हा साईसंदेश प्रत्यक्षात उतरला आहे. सोशल मीडियावरील एका साध्या भावनिक संदेशाने संपूर्ण शिर्डी गाव एकवटले आणि काही तासांतच पाच लाख रुपयांची मदत गोळा करून ती थेट ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आली.‘शिर्डी के साईबाबा’ या १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपटातून साईबाबांची भूमिका साकारून संपूर्ण जगभर श्रद्धा व सबुरीचा संदेश पोहोचविणारे अभिनेते सुधीर दळवी सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असून मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत व आर्थिक अडचणींबाबत माहिती मिळताच शिर्डी ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हृदयस्पर्शी मोहीम सुरू केली आणि अवघ्या काही तासांतच माणुसकीचा अद्भुत नमुना घडवून दाखवला.

शिर्डीचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोंदकर यांनी गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली “साईंच्या रुपातील सुधीर दळवींना आपण विसरू नये. त्यांनी साईबाबांचा संदेश जगभर पोहोचवला, आता त्यांना आपली गरज आहे.”या पोस्टनंतर काही मिनिटांतच शेकडो साईभक्तांनी प्रतिसाद दिला. त्याच संध्याकाळी हॉटेल ‘द्वारका’ येथे ग्रामस्थांची तातडीची बैठक घेण्यात आली आणि त्यात श्रीरामनवमी उत्सवातील उरलेले साडेचार लाख रुपये सुधीर दळवींच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित ५० हजार रुपये गावकऱ्यांनी काही तासांतच वर्गणीने गोळा केले. या पुढाकारात व्यापारी, महिला मंडळे, मंदिर सेवेकरी, रिक्षाचालक, तरुण वर्ग अशा सर्व घटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येकाने आपल्या परीने देणगी देत साईंच्या रुपातील कलाकाराबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.

या उपक्रमाला आणखी बळ मिळाले जेव्हा श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा अर्धा दिवसाचा पगार दान देण्याचा निर्णय घेतला. “हे केवळ आर्थिक साहाय्य नाही, तर साईभक्तीचा प्रत्यक्ष अविष्कार आहे,” असे संस्थानमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मंदिर परिसरात सायंकाळी भक्तांनी मेणबत्त्या लावून सुधीर दळवींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

शिर्डीतील या भावनिक उपक्रमाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीतून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून “सरकार आणि साईभक्त एकत्र आले की कोणतेही कार्य अशक्य नाही” असे म्हणत लोकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ग्रामस्थ आणि भक्त वर्गात आता एकच अपेक्षा व्यक्त होत आहे साई संस्थानने अधिकृतरित्या सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत जाहीर करावी. “हे केवळ दान नव्हे, तर साईभक्तीची परंपरा जपण्याचं कर्तव्य आहे,” असे ज्येष्ठ साईभक्तांनी सांगितले.

या घटनेनंतर शिर्डी गावात सर्वत्र एकच प्रार्थना घुमते “बाबांच्या कृपेने सुधीरजी लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा एकदा साईच्या दर्शनाला यावेत.” ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटाने साईभक्तीची ज्योत सात समुद्रापार पोहोचवली होती. त्या चित्रपटातील साईंचा शांत, संयमी आणि करुणामय चेहरा आजही साईभक्तांच्या हृदयात कोरला गेला आहे. म्हणूनच, त्या साईंच्या रुपात झळकलेल्या कलाकारासाठी शिर्डीकरांनी दाखवलेली माणुसकी ही खरी साईसेवा आहे. शिर्डीच्या पवित्र भूमीतून उभा राहिलेला हा उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सोशल मीडियावरील एका छोट्या संदेशातून उगवलेली ही माणुसकीची लाट पुन्हा एकदा सिद्ध करते की “साईंच्या भक्तांच्या मनात माणुसकीचेच साम्राज्य आहे.”

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!