Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरसामाजिक बांधिलकीचा आदर्श: चव्हाण दांपत्याकडून माऊली वृद्धाश्रमास किराणा भेट

सामाजिक बांधिलकीचा आदर्श: चव्हाण दांपत्याकडून माऊली वृद्धाश्रमास किराणा भेट

सुभाष वाघुंडे यांच्या सेवाभावाचा हृदयस्पर्शी प्रवास

श्रीरामपूर (प्रतिनिधी): सामाजिक बांधिलकी केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून दाखवून द्यायची असते, याचे जिवंत उदाहरण म्हणून श्रीरामपूर येथील नगरसेवक दिपक चव्हाण आणि नगरसेविका वैशाली चव्हाण यांचे नाव घेतले जाते. अक्षय्य तृतीया व आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा उत्सव कोणताही अनावश्यक खर्च न करता त्यांनी माऊली वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेस अर्पण केला. गरजूंना मदत आणि समाजासाठी योगदान देण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारत वृद्धाश्रमासाठी आवश्यक किराणा साहित्य स्वखर्चाने खरेदी करून प्रत्यक्ष जाऊन सुपूर्त केला.

या वेळी उपस्थित असलेल्या नगरसेवक रवी पाटील यांनी चव्हाण दांपत्याच्या कार्यशैलीचं विशेष कौतुक केलं. “सामाजिक काम करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण चव्हाण दांपत्याची ही पद्धत निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी आठवण करून दिलं की, कोरोना काळात संपूर्ण शहरात गरजूंसाठी घरपोच अन्नदान करण्याचं मोठं अभियान या दांपत्याने हाती घेतलं होतं. कार्यक्रमात वाघुडे यांनी माऊली वृद्धाश्रम स्थापनेमागील त्यांच्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी प्रसंग उलगडला. “दिंडीमध्ये सेवा करत असताना एके दिवशी पुण्यात एका वृद्ध महिलेचे अश्रू पाहून मन हेलावले. त्याक्षणीच ठरवलं की आपण वृद्धांसाठी काहीतरी करायचं,” असे सांगत त्यांनी पत्नीच्या सहकार्याने कर्ज काढून वृद्धाश्रम सुरू केला. सात वर्षांमध्ये ६५ वृद्धांना त्यांनी त्यांच्या मूळ घरी पाठवलं असून, सध्या १५ आजी-आजोबा येथे सुखाने राहत आहेत.

या प्रसंगी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनीही चव्हाण दांपत्याच्या निस्वार्थ सेवाभावाचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, “२०१६ मध्ये दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांनी कोणतीही निवडणूक नसतानाही शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत लाभ देण्याचे काम केले.” त्यांनी सामाजिक सेवा केवळ राजकीय हेतूंनी नव्हे, तर समाजप्रेमातून केली असल्याचे खोरे यांनी सांगितले. हे सगळे कार्य केवळ एक मदत नव्हे, तर समाजातील इतरांना प्रेरणा देणारा एक सकारात्मक संदेश आहे. चव्हाण दांपत्याच्या कार्यातून “वैयक्तिक आनंदात सामूहिक भल्याचा विचार” ही मूल्यं स्पष्टपणे प्रतिबिंबित होतात. अशा सेवाभावी कार्यकर्त्यांमुळे समाजात आशा आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण होते, हे नक्की.

दिपक चव्हाण यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे व वृद्धाश्रम परिवाराचे मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितले की, “हा दिवस आमच्यासाठी खास होता, पण तो वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या सान्निध्यात साजरा करून खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरला. आम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.” चव्हाण दांपत्याच्या या सामाजिक भानातून पुढील काळातही प्रेरणादायी उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

याप्रसंगी वृद्धाश्रम अध्यक्ष सुभाष वाघुडे, मा. नगरसेवक रवी पाटील, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, मा. नगरसेविका स्नेहल खोरे, बबलु गायकवाड, सोनू जामकर, शरद जाधव, चंदन सिंग जुनी, किरण पठारे, योगेश व्यवहारे, समीर मनियार,प्रुथ्वी चव्हाण,सविता काळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
88 %
1.5kmh
91 %
Tue
25 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!