शिर्डी साईबाबा संस्थान हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि श्रद्धेचे केंद्र मानले जाते. याठिकाणी देशभरातून तसेच परदेशातूनही लाखो भाविक दररोज भेट देत असतात. त्यामुळे साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, प्रभावी योजना, स्थानिकांचा समावेश आणि सामाजिक समरसता या गोष्टी अत्यंत आवश्यक ठरतात. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीत श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांचा समावेश करण्यात यावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केली आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ गेली वीस वर्षे अनुसूचित जातीसाठी राखीव असूनही या तालुक्याच्या विकासाचे चित्र अत्यंत निराशाजनक आहे. शेती, उद्योग, तरुणांना रोजगार यासारख्या मूलभूत बाबींमध्ये श्रीरामपूर तालुका दिवसेंदिवस मागेच पडत चालला आहे. गोविंदराव अदिक, जयंतराव ससाणे यांसारख्या दिग्गज नेत्यांनंतर या तालुक्याला ठोस नेतृत्व मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांना सशक्त आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे.
राज्य सरकारने नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून विकास आराखडा तयार करण्याचा संकल्प केला आहे. या आराखड्यात शिर्डी परिसर, पुणतांबा, लाडगाव, नाऊर, खैरी, निमगाव आणि श्रीरामपूर या भागांचा समावेश होणे गरजेचे आहे. शिर्डी संस्थानला ‘दक्षिण काशी’ असे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे या संपूर्ण परिसराचा समावेश विकास आराखड्यात करणे अत्यावश्यक ठरते. सदर प्रशासकीय समिती स्थापन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यात आली. या समितीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार सहभागी करण्यात आले, मात्र शिर्डीला लागून असलेल्या आणि प्रभु श्रीरामाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार्या आमदार हेमंत ओगले यांना या समितीत संधी देण्यात आलेली नाही. ही बाब खेदजनक असून राजकीय पक्षभेद न करता सर्वांना समान संधी देणे हेच लोकशाहीचे खरे दर्शन आहे, असे लोंढे यांनी म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून हेमंत ओगले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, तरीही राजकारण बाजूला ठेवून ते आता श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. हेमंत ओगले यांच्या सहभागामुळे साई संस्थानच्या व्यवस्थापनात एका अभ्यासू, विकासाभिमुख व स्थानिक नेतृत्वाची भर पडेल, असा त्यांचा विश्वास आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. रेल्वेमार्ग, रस्ते, तरुणांना रोजगार, शेतीमालास बाजारभाव, पायाभूत सुविधा या सर्व बाबींमध्ये येथील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रोटेगाव, सरला बेट, हरेगाव या परिसरातून जाणारा प्रस्तावित रेल्वेमार्ग गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गाचा लाभही या भागाला मिळणे आवश्यक आहे. यासाठी लाडगाव, नाऊर, खैरी, निमगाव, श्रीरामपूर असा ईंटरचेंज करून या भागाचा विकास आराखड्यात समावेश होणे गरजेचे आहे.
राज्य सरकारने साई संस्थानच्या व्यवस्थापन समितीत राजकीय समीकरणांची खेळी खेळून एका महत्त्वाच्या भागाला दुर्लक्षित केले आहे. हा तालुका अनुसूचित जातीसाठी राखीव असूनही त्याचे प्रतिनिधित्व होणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहितीही अशोक लोंढे यांनी दिली आहे. अशोक लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर एक गौरवगीत – पोवाडा तयार केला असून, हा पोवाडा खुद्द मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूर येथे ऐकून कौतुक केले होते. त्यामुळे लोंढे यांचा मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क असून या मागणीसाठी ते लवकरच अधिकृतपणे भेट घेणार आहेत.
कोंग्रेस पक्षाच्या आमदाराचा प्रतिनिधित्व असलेला हा तालुका असला तरी सध्या पक्षीय राजकारणाला बाजूला ठेवून समन्वयाच्या आधारावर विकासाला चालना देण्याची गरज आहे. त्यामुळे आ. हेमंत ओगले यांचा साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय समितीत समावेश करणे केवळ राजकीय निर्णय नसून, सामाजिक व स्थानिक गरज लक्षात घेऊन करण्यात येणारी दूरदृष्टीची पावले ठरतील. या मागणीस जनतेचा मोठा पाठिंबा मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या मागणीची दखल घ्यावी आणि श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांचा साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय समितीत समावेश करून या भागाच्या विकासासाठी एक ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केली आहे.