Homeमहाराष्ट्रश्रीरामपुर"सरकारचे अपयश लपवण्यासाठी तिरंगा सन्मान यात्रा" शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांचा आरोप

“सरकारचे अपयश लपवण्यासाठी तिरंगा सन्मान यात्रा” शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांचा आरोप

श्रीरामपुर : सध्या भारतीय जनता पक्षाकडून देशभरात ‘तिरंगा सन्मान यात्रा’ राबवण्यात येत असून, यामागे केवळ स्वतःचे राजकीय अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सरकारच्या पाकिस्तानविषयक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी भारतीय पर्यटकांवर हिंदू असल्याच्या कारणाने गोळीबार झाला आणि त्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ जाहीर करून जनतेमध्ये आशा निर्माण केली होती की भारत आता पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाई करेल. मात्र प्रत्यक्षात झाले त्याच्या नेमकं उलट. ऑपरेशनच्या दिवशीच पाकिस्तानने भारताच्या सीमांवर 40 ते 50 नागरिकांची हत्या केली. त्यानंतर अमेरिकेच्या दबावाखाली भारताने युद्धबंदी स्वीकारली, आणि परिणामी भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी नाचक्की झाली.

बडदे पुढे म्हणाले की, युद्धबंदी जाहीर करण्यात भारताचा वेळ वाया गेला, आणि तरीही पाकिस्तानने रात्री नऊ वाजता भारतावर बॉम्बहल्ला केला. युद्धाची सुरुवात आणि शेवट दोन्ही पाकिस्तानकडून झाले, मग भारताचे योगदान नेमके काय राहिले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, पाकिस्तान सध्या कमकुवत स्थितीत आहे. बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानसारखे प्रदेशही पाकिस्तानविरोधात उभे आहेत. भारताने या परिस्थितीचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर भारतात आणायला हवा होता. मात्र सरकारने युद्ध अर्धवट सोडून मोठी संधी गमावली. दुसऱ्याच दिवशी काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा हल्ला केला आणि यामधून सरकारच्या धोरणांची अपयशी बाजू स्पष्ट होते. बडदे यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उभे करत सांगितले की, सरकार म्हणते पाकिस्तानला झुकवलं, परंतु पाकिस्तानने कोणत्या अटी मान्य केल्या हे आजतागायत स्पष्ट करण्यात आलेले नाही. उलट भारताने मागितलेल्या अतिरेक्यांच्या हस्तांतरणाला पाकिस्तानने नकार दिला. मसूद अजहरसारख्या कुख्यात दहशतवाद्याला पाकिस्तान ‘साधा मौलाना’ म्हणत संरक्षण देतो, ही बाब अत्यंत धक्कादायक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

शिवसेना नेत्यांनी सरकारकडून करण्यात आलेल्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केंद्राने सांगितले की पाकिस्तानची चार विमाने पाडण्यात आली आणि पाच पायलट पकडले गेले, पण यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा आजवर सरकारने सादर केलेला नाही. त्यामुळे भारतीय जनतेच्या भावना भडकवून केवळ भावनिक राजकारण सुरू असल्याची भावना 140 कोटी जनतेच्या मनात निर्माण झाली असल्याचे बडदे म्हणाले. “हीच वेळ होती पाकिस्तानचे तीन-चार भाग करायची, पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायची, पण सरकारने ती संधीही गमावली. यातून मिळाले तरी काय? उलट नुकसान केवळ भारताचेच झाले आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. याप्रकारच्या यात्रा म्हणजे “मूर्खाच्या नंदनवनात फिरणे” आहे, असे विधान करत त्यांनी जनतेला जागृत होण्याचे आवाहन केले. “देशभक्तीच्या खोट्या घोषणा देणाऱ्यांनी जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. तुम्ही ज्यांना मत दिलं, त्यांना आता प्रश्न विचारा. जर तेच तुमच्या भावना पायदळी तुडवत असतील, तर अन्यायाविरोधात आवाज उठवा,” असा ठणकावून संदेश सचिन बडदे यांनी दिला.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
87 %
1.5kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!