Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरसनशाईन प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये पारंपरिक उत्साहात दांडिया महोत्सव साजरा

सनशाईन प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये पारंपरिक उत्साहात दांडिया महोत्सव साजरा

विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग — पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील सुतावणे वस्ती परिसर नवरात्रीच्या सणाच्या रंगात न्हाऊन निघाला होता. त्यातच येथील सनशाईन प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये पारंपरिक जल्लोषात दांडिया महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी सजावट आणि गारव्याने भारलेले वातावरण यामुळे शाळेचा परिसर एकप्रकारे छोटेखानी “गरबा नगरी” बनला होता. नवरात्रीचा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. लहान मुलांपासून पालक व शिक्षकांपर्यंत सर्वांनी दांडियाच्या तालावर थिरकत संस्कृतीचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपरिक पेहरावात प्रवेश केला. मुलांनी कुर्ता-पायजमा, पगडी, जॅकेट परिधान केले होते, तर मुलींनी रंगीबेरंगी लहेंगा-चोळी, ओढणी आणि दागिन्यांनी सजून कार्यक्रमाला उत्सवी रंग दिला. या पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळणारी लहान मुले-मुली पाहून उपस्थितांचे डोळे आनंदाने भरून आले. दांडियाच्या तालावर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या नृत्यप्रस्तुतींना प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. शाळेच्या प्रांगणात नवरात्रीचे गाणे आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गरबा सर्कल’ने वातावरणात उत्साहाची लाट निर्माण केली.

या कार्यक्रमाला समाजसेविका धनश्री अर्जुन दाभाडे विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे आणि सादरीकरणाचे कौतुक करताना आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, आपली भारतीय परंपरा ही सण-उत्सव, नृत्य-संगीत, सहजीवन आणि एकतेचा अनोखा संगम आहे. दांडिया आणि गरबा हे फक्त नृत्य नसून ते भक्ती, आनंद आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक आहेत. लहान वयातच मुलांना या परंपरांशी जोडले तर त्यांच्या मनात संस्कृतीबद्दल आदराची भावना दृढ होते. त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे आणि शिक्षकवर्गाचे अभिनंदन करत सांगितले की अशा प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका संचिता संजय नरोटे यांनी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की शाळेतील मुलांच्या विकासात नृत्य, कला, संगीत व पारंपरिक कार्यक्रमांची भूमिका मोलाची आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, समूहात कार्य करण्याची सवय, सामाजिक भान आणि संस्कृतीबद्दल आदर निर्माण होतो. दांडिया महोत्सव ही त्याचीच एक सुंदर अनुभूती आहे.”

या कार्यक्रमात पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. शाळेने विशेष निमंत्रित केलेल्या पालकांनीही पारंपरिक पोशाखात सहभागी होत आपल्या मुलांसोबत दांडिया खेळला. मुलांना शाळेच्या कार्यक्रमात पालकांसोबत थिरकताना पाहून सगळ्यांचे मन भारावून गेले. अनेक पालकांनी यावेळी शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.पालकांनी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात मुलांना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर ठेवून अशा कार्यक्रमांत सहभागी करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे मुलांचा सामाजिक व सांस्कृतिक विकास घडतो. या दांडिया महोत्सवात शाळेचे चेअरमन वीरेश लबडे, व्हाईस चेअरमन विद्या लबडे, तसेच सरस्वती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अर्जुन कासार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

चेअरमन वीरेश लबडे यांनी सांगितले की, शैक्षणिक प्रगतीसोबतच मुलांमध्ये संस्कार आणि संस्कृतीची पेरणी होणे गरजेचे आहे. दांडिया महोत्सवातून मुलांना आपली परंपरा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळते, हीच आमची खरी प्रेरणा आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवर्गाने उत्तम समन्वय साधला. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची सादरीकरणे नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. शिक्षकांनी मुलांना नृत्य शिकवणे, सजावट करणे, वेळापत्रक आखणे यासाठी विशेष मेहनत घेतली होती. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांचा सक्रिय प्रतिसाद आणि व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा यामुळे हा दांडिया महोत्सव शाळेच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. एका बाजूला पारंपरिक दांडियाचे रंग होते, तर दुसरीकडे आकर्षक प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाचे सादरीकरण हे आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन दर्शवत होते.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘जय माता दी’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमवले आणि नवरात्रीचा आनंद सर्वांनी एकत्र साजरा केला.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
12.1 ° C
12.1 °
12.1 °
48 %
1.6kmh
0 %
Tue
29 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!