श्रीरामपूर (प्रतिनिधी) – योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने, ब्रह्मलीन श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि गुरुवर्य महंत प.पू. रामगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र सराळा बेट) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गोदावरी धाम (बेट सराला) ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी भव्य पायी दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली आहे.
या दिंडीचे प्रस्थान शुक्रवार, दिनांक २० जून २०२५ रोजी बेट सराळा येथून झाले. त्याच दिवशी उंदिरगाव येथे दिंडीचा मुक्काम झाला, तर शनिवारी, दिनांक २१ जून रोजी श्रीरामपूर येथे दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गांधी चौक येथे प्रकाश चित्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिंडीचे पुष्पवृष्टी व घोषणांनी स्वागत करून सेवाकार्य पार पाडले. त्यानंतर राम मंदिर चौक येथे दिंडीचे रिंगण पार पडले, जिथे वारकऱ्यांनी अभंग गात, टाळ-मृदुंगाच्या निनादात भक्तीमय वातावरण निर्माण केले. यानंतर दिंडी थत्ते ग्राउंड येथे पोहोचली आणि ‘गोल रिंगण’ उत्साहात साजरे झाले. मुक्काम उत्सव मंगल कार्यालयात पार पडला. उद्या सकाळी दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
सुमारे दोन हजार वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या पायी दिंडी सोहळ्याची संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तबद्धता आणि भक्तिमय वातावरणामुळे विशेष ओळख आहे. दिंडी सोहळ्यात दिंडीचे व्यवस्थापक मधु महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी नगराध्यक्ष संजय फंड, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, भाजप नेते बंडूकुमार शिंदे, मा. सभापती डॉ. वंदना मुरकुटे, मा. आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रकाश चित्ते आदी मान्यवरांनी हजेरी लावून वारकऱ्यांचे स्वागत व कौतुक केले.
दिंडी सोहळ्यातील शिस्तबद्धतेचे, एकोप्याचे आणि अध्यात्मिक वातावरणाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व भाविकांनी आगामी प्रवासातही असेच उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक वारकरी ओढीनं मार्गक्रमण करत असून त्यांच्या श्रद्धेची आणि समर्पणाची महती या सोहळ्यातून पुन्हा एकदा प्रकट झाली आहे. अशा पवित्र सोहळ्यातील सामूहिक सहभागामुळे सामाजिक एकोपा, भक्तीभाव आणि परंपरेचे संवर्धन होत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी सेवेकरी आणि भाविकांनी सक्रिय सहभाग घेतला असून आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.