श्रीरामपूर (प्रतिनिधी) – विविध जाती-धर्मांचे साक्षात प्रतीक असलेल्या श्रीरामपूर शहरात सलोख्याचे माहोल जपण्यासाठी श्रीराम तरुण मंडळाने उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे. मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही हज यात्रेकरूंना निरोप समारंभाचे आयोजन श्रीराम मंदिर चौकात मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते अहमदभाई जहागीरदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिल पांडे, माजी नगरसेवक नितीन पिपाडा, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, बुरहान भाई जमादार, ॲड. आदेश दुशिंग, संजय यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी सांगितले की, शहरात रामनवमी व उरूस एकत्र साजरा करण्याची परंपरा प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र महाराज उपाध्ये यांच्या मार्गदर्शनात सुरू झाली. ही परंपरा जपण्यासाठी मंडळ सतत प्रयत्नशील आहे. सलोखा जपण्यासाठी हज यात्रेकरूंना निरोप देण्याचा हा कार्यक्रम हेच त्या परंपरेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हज यात्रेकरूंना मक्का-मदिना येथे श्रीरामपूर शहरातील सलोखा अबाधित राहावा, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी आपल्या भाषणात श्रीराम तरुण मंडळाच्या सर्वसमावेशक कार्याची प्रशंसा केली. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक सलोखा टिकवण्यासाठी मंडळाचे कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सर्व हज यात्रेकरूंच्या वतीने आयोजकांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात अहमदभाई जहागीरदार यांनी बदलत्या सामाजिक वातावरणात देखील सलोखा टिकवण्यासाठी नागरिकांनी एकमेकांमध्ये ऐक्य जपण्याचे आवाहन केले. हज यात्रेनंतर परतल्यावर प्रत्येकाने आपल्या जीवनात त्याचे अनुकरण करावे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात हज यात्रेस जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, मतीन शेख, फारूक शाह, बेगु पटेल, सलीम शेख, फिरोज तांबोळी, रियाज अब्दुल पठाण, अंजर युसूफ पठाण, रफिक मेमन, सोहेल मुसानी आदींचा हाजी रुमाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक उपाध्ये यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी मानले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी राजू सोनवणे, गौतम उपाध्ये, राजेंद्र उंडे, आयाज तांबोळी, सोमनाथ चापानेरकर, रमाकांत पाथरकर, सतीश शहाणे, जयराम उपाध्ये, अमोल भस्मे, शशिकांत कडुस्कर, ज्ञानेश्वर पटारे, रविंद्र कांबळे, नाजीम शेख, अमन मंसूरी, जाफरखान, मंजूर मलिक, अर्षद मलिक, मुस्ताक तांबोळी, दीपक कदम, जयश सावंत, सय्यद जाकीर सर, इजाज पठाण आदी उपस्थित होते. श्रीरामपूर शहरात सर्व धर्मीय सलोखा आणि ऐक्य टिकवण्यासाठी आयोजित झालेला हा उपक्रम एक आदर्श निर्माण करणारा ठरला.