Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर सोनार गल्लीत अतिक्रमणावरील कारवाई; व्यापाऱ्यांचा रोष, राजकीय चर्चेला ऊत

श्रीरामपूर सोनार गल्लीत अतिक्रमणावरील कारवाई; व्यापाऱ्यांचा रोष, राजकीय चर्चेला ऊत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेत कारवाई सुरू केली असून सोमवारी सकाळपासून सोनार गल्ली परिसरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अनेक अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. अचानक झालेल्या या हालचालीमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी प्रशासनावर अन्यायाचा आरोप करीत संताप व्यक्त केला.

पालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानदारांना तीन दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला कोणतीही दाद मिळाली नाही. अखेर नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम पूर्ण केली. बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने दुकाने पाडल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला.

यावेळी व्यापाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदविताना, “आमच्याकडे जागेची वैध खरेदी कागदपत्रे आहेत. तरीही आमची दुकाने अतिक्रमणात कशी धरली जातात?” असा सवाल केला. तसेच, “जर अतिक्रमण हटवायचेच असेल, तर छत्रपती शिवाजी रोडपासून मेन रोडपर्यंत असलेले सर्वच अतिक्रमण काढा. निवडक कारवाई का?” अशी मागणी त्यांनी जोरदारपणे केली.

पालिकेच्या या कारवाईमुळे सोनार गल्लीत वातावरण तणावग्रस्त झाले होते. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी व्यापाऱ्यांचा संताप ओसरण्याचे नाव घेत नाही. या कारवाईनंतर शहरातील इतर अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “आमच्याही दुकानांवर कधी बुलडोझर चालेल का?” अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या या पावलावर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नेत्यांनी कारवाईला समर्थन देत “अतिक्रमण हटविणे अपरिहार्य” असे म्हटले असले, तरी काहींनी या कारवाईत निवडक पद्धत अवलंबल्याचा आरोप केला. त्यामुळे ही कारवाई केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता आता राजकीय रंग घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चला तर बघूया

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!