Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर शहर पोलीसांची यशस्वी कारवाई : केवळ ४८ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस

श्रीरामपूर शहर पोलीसांची यशस्वी कारवाई : केवळ ४८ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस

सासूच्या घरात घरफोडी करणाऱ्या जावयाला अटक, चोरी गेलेला संपुर्ण ऐवज परत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवत अवघ्या ४८ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून, चोरी गेलेला १.९४ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा छडा लावताना जे धक्कादायक सत्य समोर आले, ते म्हणजे घरफोडी ही फिर्यादी महिलेच्या स्वतःच्या जावयाने केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक ९ ते १२ जून २०२५ या कालावधीत श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक २, जुने घरकुल, रेल्वे लाईन परिसरात राहणाऱ्या रुकय्या जब्बार शेख या महिला लोणी येथे नातेवाइकांकडे गेल्या होत्या. त्यांनी आपल्या घरास कुलूप लावले होते. त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी फोडून कपाटातील सुमारे २.०४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रुकय्या शेख यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 572/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 305 (अ), 331 (3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या पथकाने शास्त्रशुद्ध तपासकार्य सुरू केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, शंका येणाऱ्या व्यक्तींची चौकशी करणे, तांत्रिक तपशील व माहितीच्या आधारे त्यांनी संशयित आरोपीपर्यंत पोहोच घेतली. तपासादरम्यान या घरफोडीमागे फिर्यादी रुकय्या शेख यांचा जावई साद शौकत शेख याचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सासूने उसने दिलेले पैसे परत न केल्याचा राग मनात धरून त्याने घरफोडीचा कट रचल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरी गेलेले सुमारे १,९४,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सदर दागिने रुकय्या शेख यांनी स्वतःची असल्याची ओळख पटवली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेकॉ. शफीक शेख (1858), पोना. भैरव अडागळे (1769), पोकों. धनंजय वाघमारे (1787), पोकों. अकबर पठाण (468), पोकों. रविंद्र शिंदे (1071) व चालक पोकों. बाळासाहेब गिरी यांनी केली. सध्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करत असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू आहे..या यशस्वी तपासामुळे श्रीरामपूर शहर पोलीस दलावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अवघ्या दोन दिवसांत आरोपीला अटक करून संपूर्ण ऐवज परत मिळवणे ही पोलिसांची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. या प्रकरणाने समाजात ‘घरफोडी’ सारख्या गुन्ह्यांबाबत पोलीस यंत्रणा किती सतर्क आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!