श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या अखंडानंद दत्त मंदिर मागील घरकुल ते भीमरत्न चौक घरकुल परिसरातील मुख्य गटार (नाला) पूर्णपणे गाळाने भरले असून, सद्यस्थितीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या गटारातून पाणी सांडून थेट घरांमध्ये प्रवेश करण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात डासांच्या प्रचंड प्रमाणात वाढीमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने दिनांक ४ जुलै रोजी श्रीरामपूर नगरपरिषद मुख्याधिकारी, आरोग्य विभाग प्रमुख यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात गटारातील गाळ तातडीने साफ करावा, आवश्यक असल्यास नवीन गटाराची निर्मिती करावी, अन्यथा स्थानिक नागरिकांसह शिवसेना मोठे आंदोलन उभारेल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “अखंडानंद दत्त मंदिर मागील घरकुल ते भीमरत्न चौक घरकुल भागातील नाल्यांमध्ये गेले अनेक महिने गाळ साचलेला असून, याकडे नगरपरिषद व संबंधित आरोग्य विभागाचे लक्ष गेलेले नाही. सद्यस्थितीत पावसामुळे ही गटारे तुंबून पाणी घरांमध्ये जात आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून, सार्वजनिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. घरकुल परिसरातील अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना या दुर्गंधीने, तसेच डासांमुळे त्रास होत असून त्यातच विषाणूजन्य आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
“निवेदनावर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुधीर वायखिंडे, राजेंद्र भोसले, संतोष चव्हाण, बबन अवसरमल, सचिन दळवी, शंकर जाधव, साई चव्हाण, संतोष पोपळघट, परसराम अवसरमल, किशोर निकाळजे, शब्बीर शेख, बलराम अवसरमल, योगेश ससाणे, मालन निकाळजे, सविता चव्हाण, गुंफाबाई वाल्हेकर, मनिषा खरात, सौ. सुगंधा अवसरमल, अनिता नरोडे, शोभा गोंधवणे, शांताबाई जाधव, दुर्गाबाई ठोकळ, सौ. पोपळघट आदी स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत.
या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, “जर प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेतली नाही आणि गटार सफाईची कामे सुरू झाली नाहीत, तर शिवसेना पक्ष आणि घरकुल रहिवासी एकत्र येऊन महत्त्वाचे आंदोलन छेडतील. या आंदोलनात रास्ता रोको, उपोषण, नगर परिषद कार्यालयासमोरील निदर्शने अशा स्वरूपाचे टप्प्याटप्प्याचे आंदोलन करण्यात येईल.” शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना देखील निवेदन पाठवले असून, या संदर्भात तातडीची बैठक घेऊन समस्या निकाली काढावी, अशी मागणी केली आहे. शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. घरकुल परिसरातील ही समस्या देखील त्याचाच एक भाग असून, मागील अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
स्थानिक रहिवाशांनुसार, “नगरपरिषद आरोग्य विभाग व बांधकाम विभाग केवळ तोंडी आश्वासने देतो, प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. त्यामुळे घरामध्ये पाणी शिरण्याची वेळ आली तर प्रशासन जबाबदार असेल.” नगर परिषदेने या समस्येची तातडीने दखल घेऊन गटार सफाई, नालेसफाई व सांडपाणी व्यवस्थापन याबाबत उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा केवळ शिवसेनेचे आंदोलनच नव्हे तर संपूर्ण घरकुल परिसरातील रहिवासी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. शेवटी, नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षा शिवसेना पक्ष व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.