श्रीरामपूर/प्रतिनिधी :– शहरातील नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरला जात असूनही या निधीचा योग्य वापर न होता तो काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाविरोधात ‘नोटाफेक आंदोलन’ छेडण्यात आले. यावेळी नगरपरिषद मुख्य गेट व मुख्याधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक चलनी नोटांचे तोरण बांधण्यात आले आणि जमिनीवर नोटा फेकून तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.
समितीचे प्रमुख अमित मुथा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरीवाला निवडणुकीत १ लाख रुपयांचा अपहार, स्टॉल वाटपातील गैरव्यवहार, दैनिक बाजार फी वसुली ठेका अटीभंग करून देखील ठेकेदारास मुदतवाढ देणे, मुख्याधिकारी निवास दुरुस्तीच्या नावाखाली खोटे बिले उकळणे यांसारख्या प्रकरणांत संबंधित अधिकारी दोषी आढळून आले आहेत. या सर्व प्रकरणांबाबत वेळोवेळी तक्रारी आणि पुरावे सादर करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करून कामात कसुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन वेळा पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दोषींना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी या आंदोलनात करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान विविध प्रकारचे दस्तऐवज व पुरावे माध्यमांसमोर सादर करून पालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात आला. नगरपरिषदेच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी समितीचे प्रमुख अमित मुथा यांनी दिला. या घटनाक्रमामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रशासनावर गंभीर आरोप झाले असून, जनतेच्या पैशांचा अपवापर, निर्णयातील अपारदर्शकता आणि दुर्लक्ष यामुळे संपूर्ण कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणाची सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक बनले आहे.