Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

श्रीरामपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अधिकारान्वये श्रीरामपूर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली. या आदेशात तालुक्यातील ५७ हून अधिक गावे व वस्त्यांचा समावेश विविध गट व गणांमध्ये करण्यात आला असून, यामुळे आगामी निवडणुकांसाठीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नव्या रचनेनुसार तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार प्रमुख गट निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये उंदीरगांव, टाकळीभान, दत्तनगर आणि बेलापूर हे गट आहे

उंदीरगांव या गटात उंदीरगांव व निमगांव खैरी हे गण समाविष्ट करण्यात आले आहेत. तर निमगांव खैरी गणात महांकाळवडगांव, माळेवाडी, मातुलठाण, रामपूर, जाफ्राबाद, सराला, नाऊर, नायगांव, गोंडेगांव व गोवर्धनपुर अशी गावे निश्चित झाली आहेत.उंदीरगांव गणात माळवडगांव, हरेगांव, मुठेवडगांव, घुमनदेव, भामाठाण, खानापूर व कमलपुर ही गावे समाविष्ट आहेत. या गटात बहुतांश कृषिप्रधान व शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली गावे आल्याने ग्रामीण विकास व शेतीविषयक प्रश्न या भागात प्रमुख ठरण्याची शक्यता आहे.

टाकळीभान या गटात टाकळीभान व निपाणीवडगांव हे गण समाविष्ट झाले आहेत. टाकळीभान गणात कारेगांव, खोकर, भोकर ही गावे तर निपाणीवडगांव गणात निपाणीवडगांव, मातापूर, वडाळा महादेव या गावाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते या मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला यावर उपाययोजना करावी लागणार आहे.

दत्तनगर या गटात दत्तनगर व उक्कलगांव हे गण ठेवण्यात आले आहेत. दत्तनगर गणात, दत्तनगर, शिरसगांव, दिघी, ब्राम्हणगांव वेताळ व भैरवनाथनगर ही गावे तर उक्कलगांव गणात मांडवे, एकलहरे, फत्याबाद, कुरणपुर, खंडाळा, गळनिंब, कडीत खु. व कडीत बु. ही महत्त्वाची गावे समाविष्ट आहेत. हा गट राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो. दत्तनगर व उक्कलगांव परिसरात पूर्वीपासून राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे येथील निवडणूक लढती विशेष चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

बेलापूर या गटात बेलापूर बु. व पढेगांव हे गण निश्चित झाले आहेत. बेलापूर बु. गणात बेलापूर खु., ऐनतपूर, नर्सरी व वळदगांव. तर पढेगांव गणात मालुंजा बु., खिर्डी, लाडगांव, भेर्डापूर, कान्हेगांव, उंबरगांव, वांगी बु., वांगी खु. व गुजरवाडी ही गावे. बेलापूर हा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावशाली विभाग मानला जातो. येथे मोठ्या राजकीय नेत्यांचा प्रभाव असल्याने या गटातील निवडणुका उत्सुकतेचा विषय ठरणार आहेत.

या नव्या रचनेमुळे तालुक्यातील प्रतिनिधित्व अधिक व्यापक झाले आहे. पूर्वी विखुरलेल्या गावांना आता एकत्र आणण्यात आल्याने विकास योजनांचे नियोजन व अंमलबजावणी अधिक सोपी होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या प्रश्नांसाठी प्रशासनाला एकत्रित योजना करता येणार आहेत. मात्र, काही गावांची स्वतंत्र ओळख कमी झाल्याने असंतोषाचे सूर उमटले आहेत. स्वतंत्र प्रभागाच्या अपेक्षेत असलेल्या काही गावांचे विलिनीकरण मोठ्या गटांमध्ये झाल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. या प्रभाग रचनेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे बदल घडण्याची चिन्हे आहेत. बेलापूर व दत्तनगर हे दोन्ही गट राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरत असून उमेदवारांची चुरस वाढणार आहे. उंदीरगांव गटात ग्रामीण भागातील नेतृत्व पुढे येईल अशी अपेक्षा आहे. टाकळीभान गटात तरुण नेतृत्वाला संधी मिळू शकते.राजकीय पक्षांनी या नव्या रचनेनुसार रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, स्थानिक नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

या आदेशामुळे केवळ राजकीयच नाही तर सामाजिक घडामोडींनाही नवे वळण मिळणार आहे. मोठ्या गावांना लहान गावांबरोबर एकत्र आणल्याने सहकार्याची भावना वाढेल. विकास निधी अधिक समतोलपणे वितरित होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, काही लहान गावांचा आवाज मोठ्या गावांमध्ये दडपला जाण्याची भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत. एकूणच, श्रीरामपूर पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सुविधा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी ही रचना उपयुक्त ठरेल, तर राजकीय पातळीवर ती नवे समीकरण घडवेल. त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुका अधिक रंगतदार आणि चुरशीच्या होण्याची शक्यता आता स्पष्ट झाली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!