Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ने खळबळ – प्रसिद्ध डॉक्टरपुत्राचा मद्यधुंद अवस्थेत रिक्षांना जोरदार...

श्रीरामपूरात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ने खळबळ – प्रसिद्ध डॉक्टरपुत्राचा मद्यधुंद अवस्थेत रिक्षांना जोरदार धडक, नागरिकांमध्ये संताप

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरात शनिवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शहरातील एका प्रतिष्ठित हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत असताना दोन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. विशेष म्हणजे, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित डॉक्टरपुत्राला अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

शनिवारी (दि. १२ जुलै) रात्री १० वाजेच्या सुमारास संगमनेर रोडवरील रस्त्यावर एमएच-१७ सीएम-१५१५ क्रमांकाची टाटा हॅरियर गाडी भरधाव वेगात येऊन थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडकली. अपघात इतका जबरदस्त होता की, रिक्षा अक्षरशः १० फूट अंतरावर उडाली. सदर गाडी डॉक्टरपुत्र चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार स्पष्ट झाले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूर्णतः मद्यधुंद अवस्थेत होता व त्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. या अपघातात सुदैवाने रिक्षांमध्ये कोणतेही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, रिक्षांचे नुकसान प्रचंड झाल्याचे वाहनधारकांनी सांगितले. अपघात घडल्यानंतर काही क्षणातच परिसरात मोठी गर्दी जमली व संतप्त नागरिकांनी त्या तरुणास रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही व्यक्तींच्या मदतीने तो युवक घटनास्थळावरून पसार झाला, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली व अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर तब्बल १६ ते १७ तास उलटूनही सदर प्रकरणी कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनावर दबाव आणून ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे. शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरपुत्राने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून असा गंभीर अपघात घडवूनही त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याचे पाहता, कायदा सर्वांसाठी सारखा आहे का, असा प्रश्न आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. पोलीस प्रशासन हे कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, याविषयी संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणात कायद्याची अंमलबजावणी होईल की नाही, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

दुर्दैवाने, श्रीरामपूरसारख्या शहरात उच्चभ्रू वर्तुळातील लोकांकडून कायद्याचा उघडपणे अपमान होत असल्याच्या घटना नव्या नाहीत. मात्र, या घटनेमुळे नागरिकांचा संयम सुटताना दिसत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेबाबत पारदर्शक तपास करावा व संबंधित दोषींवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी जनतेची ठाम मागणी आहे. अन्यथा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!