Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरात गॅंगवारसदृश घटना; गावठी कट्ट्याने दहशत माजवणाऱ्या आरोपीस नागरिकांनी पकडले

श्रीरामपूरात गॅंगवारसदृश घटना; गावठी कट्ट्याने दहशत माजवणाऱ्या आरोपीस नागरिकांनी पकडले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरातील गोंधवणी परिसरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या गॅंगवारसदृश घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धिंड काढण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने गावठी कट्टा दाखवून स्थानिक किराणा दुकानदाराला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, प्रसंगावधान राखून काही स्थानिक युवकांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीस पकडले व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे मोठा अनर्थ टळला. दुसरा आरोपी मात्र या गोंधळात फरार झाला आहे. गोंधवणी परिसरात समीर शेख यांचे किराणा दुकान आहे. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रशांत भांड व गणेश उंडे हे दोघे त्या दुकानात आले. त्यांनी सिगारेट व सोडावॉटरची मागणी केली. त्याचवेळी त्यांनी दुकानदार समीर शेख याच्याकडे आक्रमकपणे विचारणा केली, “तुझा भाऊ कुठे आहे? तुझा भाऊ आणि भैय्या दाभाडे आम्हाला शिव्या देतात.” असे म्हणत त्यांनी अचानक गावठी कट्टा काढला व समीर शेख याच्यावर रोखला.

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, नेहमीप्रमाणे दुकान परिसरात उपस्थित असलेल्या काही युवकांनी प्रसंगावधान राखून धाडसाने पुढे येत आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. झटापटीत गणेश उंडे नामक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, परंतु प्रशांत भांड यास जमावाने पकडले. जमावाने त्याला चोप देत त्याच्याकडील गावठी कट्ट्यासह श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता आरोपी अंमली पदार्थांच्या नशेत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देखील शहरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये इंजेक्शन व इतर नशेच्या आहारी गेलेल्या युवकांचा सहभाग आढळून आला आहे. शहरातील वाढता गुन्हेगारी प्रवृत्तीचा ट्रेंड आणि शस्त्रधारी तरुणांचा उदय ही प्रशासनासाठी गंभीर बाब ठरत आहे.

या घटनेनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रशांत भांड याच्यावर शस्त्र बाळगण्यासंबंधी आणि धमकावण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तर फरार आरोपी गणेश उंडे याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली. “अशा प्रकारची गुन्हेगारी वृत्ती समाजात भितीचं वातावरण निर्माण करत आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी,” अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गँगवारसदृश घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अल्पवयीन तसेच युवकांमध्ये गँग कल्चर, अंमली पदार्थांचा वापर व सोशल मीडियाद्वारे उन्माद पसरवण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त मोहीम हाती घेण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी अधिक जागरूकता, पोलिसांची नियमित गस्त आणि अंमली पदार्थांविरोधातील कारवाया या बाबी तातडीने आवश्यक आहेत. श्रीरामपूरच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करणे अत्यावश्यक ठरत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
79 %
3kmh
100 %
Mon
30 °
Tue
26 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!