श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरात दोन ठिकाणी गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल केल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुरुवारी (११ जुलै) सकाळी पहाटे साडेसहाच्या सुमारास धडक कारवाई करत सुमारे २१०० किलो गोमांस, विविध कत्तलीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे, व वाहतूक करणारे वाहन अशा एकूण १० लाख २१ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विस्मिल्ला नगर, वार्ड क्र. २ तसेच अहिल्यादेवी नगर, जैनब मस्जिदजवळील बंजरंग चौक परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्या मांसाची विक्रीसाठी तयारी केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार देशमुख यांनी तपास पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी पंचासह दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले असता सदर ठिकाणी काही व्यक्ती कत्तल केलेल्या मांसाचे छोटे छोटे तुकडे वाहनात भरत असताना आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मोसीन ऊर्फ बुंदी इसाक कुरेशी (३५, रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर), शोएब सलीम कुरेशी (३०, रा. सुभेदार वस्ती, श्रीरामपूर),अरबाज अस्लम शहा (२३, रा. सुभेदार वस्ती, श्रीरामपूर), रिजवान युसुफ कुरेशी (३६, रा. कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर), अमजद युनुस कुरेशी (४४, रा. कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर) अशी सांगितली आहे. त्यानंतर पंचासमक्ष दोन्ही ठिकाणी सखोल तपास केला असता १८०० किलो गोमांस (किंमत अंदाजे ₹३,६०,०००), ३०० किलो गोमांस (किंमत ₹६०,०००), लहान सुरे, एक लाकडी दांड्याची कुऱ्हाड (किंमत ₹१,०००), छोटे मुरे (किंमत ₹५००), अशोक लेलँड कंपनीचे ‘छोटा हत्ती’ वाहन (MH-04-HD-8762) – अंदाजे ₹६,००,००० किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत एकूण मुद्देमालाची किंमत ₹१०,२१,५००/- इतकी आहे. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोउनि. समाधान सोळंके, पोउनि. रोशन निकम, पोहेकॉ. राजु त्रिभुवन, पोना. भैरवनाथ अडागळे, पोकों संपत बडे, अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे, सागर बनसोडे, आजिनाथ आंधळे, धनंजय वाघमारे, रविंद्र शिंदे, अकबर पठाण, तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोउनि. रोशन निकम करत असून, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, भारतीय दंड संहिता आणि वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.