श्रीरामपूर – आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काल उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भावर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रूट मार्च काढण्यात आला. निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा निर्धार पोलिस प्रशासनाने या रूट मार्चमधून स्पष्टपणे दाखवून दिला.
या रूट मार्चमध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे ६ अधिकारी, २५ कर्मचारी, आरसीपी पथकातील २७ अंमलदार, एसआरपीएफचे १ अधिकारी व २७ जवान, तसेच तब्बल ३ अधिकारी आणि ६० होमगार्ड जवानांचा सहभाग होता. गांधी चौक, राममंदिर चौक, भगतसिंग चौक, गिरमे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मौलाना आझाद चौक, गौशिया मशीद परिसर व दशमेश चौक मार्गे हा रूट मार्च पार पडला.
निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मतदान प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले. नागरिकांनी निर्भयपणे मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.




