श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये घडलेला धक्कादायक आणि आरोग्याला गंभीर धोकादायक ठरणारा प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे. शहराच्या मुख्य सिमेंट पाईपलाईनमध्ये सार्वजनिक शौचालयाचा मैला मिसळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्याची स्थिती ढासळली असून, पोटदुखी, जुलाब, त्वचारोग आणि ताप यांसारख्या आजारांनी अनेक कुटुंबे त्रस्त झाली आहेत. या प्रकाराविरोधात शहरातील विविध पक्ष, संघटना, व्यापारी, नागरिक यांनी एकत्र येत जोरदार निषेध नोंदवला.
या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी या संपूर्ण प्रकारास जबाबदार ठरणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून प्रत्येकी ५० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्याची मागणी केली. कारण या कृतीने संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या आरोग्याशी खेळ झाला आहे, असा ठपका त्यांनी ठेवला. शहराच्या पाण्याच्या पाइपलाईनवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवून ती मोकळी करण्याची मागणीही यावेळी झाली. पाणीपुरवठा होणाऱ्या साठवण तलावाभोवती संरक्षण भिंत उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, २४ तास वॉचमनची नियुक्ती करणे यासारख्या सुरक्षाविषयक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, असा ठोस आग्रह निवेदनातून मांडण्यात आला. त्याचप्रमाणे, पाटाच्या कडेला राहणाऱ्या काही नागरिकांनी थेट पाटामध्ये संडास व सांडपाण्याचे नाले जोडले असल्याचे निदर्शनास आले असून, हे सर्व अवैध जोड त्वरित बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच पाटालाही संरक्षण भिंतीने सुरक्षित करावे, अशी मागणी करण्यात आली. दीर्घकालीन उपाययोजनेंतर्गत श्रीरामपूर शहरासाठी भंडारदऱ्यावरून स्वतंत्र पाइपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी दूरदृष्टीपूर्ण मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदन प्रसंगी श्रीरामपूर शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये गौतम उपाध्ये (अध्यक्ष, मर्चंट असो.), राजेंद्र सोनवणे (माजी उपनगराध्यक्ष), अभिजित लिप्टे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), संजय छल्लारे (शिवसेना नेते) यांच्यासह अनेक मान्यवर आणि श्रीरामपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने अद्याप या गंभीर प्रकरणात ठोस कृती केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सध्या पाणीपुरवठा आणि आरोग्य यंत्रणा अक्षरशः रामभरोसे असून, प्रशासनाच्या डोळेझाक धोरणामुळे शहरात जलजन्य साथरोग पसरण्याची गंभीर शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आता रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचे संकेत दिले आहेत.