श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहरातील शुक्रवारच्या मुख्य बाजाराचे परंपरागत ठिकाण असलेल्या अक्षय कॉर्नर आणि संजीवनी हॉस्पिटल भागातून बाजार हटवून ते म्हाडा वसाहतीत स्थलांतरित करण्याचा श्रीरामपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा घाट स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांच्या एकजुटीने आणि धर्मरक्षक सागर बेग यांच्या मध्यस्थीने शांततेत हाणून पाडण्यात आला. यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला बाजार आपल्याच मूळ जागी भरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे बाजारपेठेतील व्यापारी वर्ग आणि मोरगे वस्ती परिसरातील सुमारे साडेतीनशे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्वांनी सागर बेग यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी मछिंद्र घोलप यांना सामूहिक सह्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात मूळ बाजार जागेवरच बाजार भरावा, मात्र बाजारात विक्रेते रस्त्याच्या मधोमध बसू नयेत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील दहा दिवसांपासून बाजार हलवण्याच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. विशेषतः म्हाडा वसाहतीत स्थलांतर केल्यास बाहेरगावच्या शेतकरी बांधवांना तेथे पोहोचणे कठीण झाले असते, तसेच त्यांचा व स्थानिक व्यापाराचा मोठा तोटा झाला असता, अशी भावना व्यापाऱ्यांनी मांडली.त्यांच्या म्हणण्यानुसार, पारंपरिक ठिकाणी भरणारा बाजार महिलांसाठी सुरक्षित आहे आणि अनेक वर्षांपासून कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. मात्र, एक किंवा दोन असंतुष्ट व्यक्तींनी तक्रार केल्याच्या आधारे संपूर्ण बाजार हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेऊ नये, असे स्थानिकांचे मत आहे. सागर बेग यांनी बाजारातील व्यापाऱ्यांच्या व्यथा समजून घेत, दोन्ही पक्षांना एकत्र आणत प्रशासनाकडे न्याय्य मार्गाने सादर केले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी घोलप यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेअंती मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्या मान्य करत, बाजार परंपरागत ठिकाणीच भरवण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच कोणालाही अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राजेश वाव्हाळ, सुनील पाचोणे, नितीन शिरसाठ यांच्यासह असंख्य व्यापारी, युवक आणि महिला उपस्थित होते. त्यांनी सागर बेग यांचे आभार मानत, असे समाजभान असलेले नेतृत्व भविष्यातही गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने भविष्यात कोणताही निर्णय घेताना सरसकट कारवाई करण्याऐवजी सर्वसमावेशक चर्चा करावी, हीच अपेक्षा आहे. शहराच्या सामाजिक, व्यापारी आणि नागरी समन्वयाचा उत्तम प्रत्यय या घटनेतून आला आहे. पारंपरिक बाजार पेठेचा ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ लक्षात घेता, सुसंवाद आणि लोकशक्तीच्या माध्यमातून प्रशासनाशी समन्वय साधत योग्य मार्ग काढण्याचे उदाहरण श्रीरामपूरवासीयांनी घालून दिले आहे.