Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरशिवाजी चौकातच शिवरायांचा पुतळा हवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा — मनसे शहराध्यक्ष स्वप्नील...

शिवाजी चौकातच शिवरायांचा पुतळा हवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा — मनसे शहराध्यक्ष स्वप्नील सोनार

श्रीरामपूर — छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळा स्थापनेसंदर्भातील वादग्रस्त मुद्द्यावर श्रीरामपूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली असून, शहराच्या मध्यवर्ती शिवाजी चौकातच शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा मनसे शहराध्यक्ष स्वप्नील सोनार यांनी दिला आहे. आज मनसेच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी स्वप्नील सोनार म्हणाले की, “शिवाजी चौकात शिवरायांचा पुतळा ही मागणी गेल्या ३–४ दशकांपासून श्रीरामपूरकरांची आहे. ही केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक मागणी आहे. २०२४ मध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते याच ठिकाणी भूमिपूजन पार पडलेले असताना, आता अन्य ठिकाणांचा विचार करणे हा जनभावनेचा अपमान ठरेल.

“त्याचबरोबर स्वप्नील सोनार यांनी धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा भाजी मंडईसमोर सुरू असलेल्या ठिकाणी बसवण्याची मागणीही केली. “सदर ठिकाणी लाखो रुपये खर्चून बांधकाम सुरू असून, हा निधी वाया न जाऊ देता संभाजी महाराजांचा पुतळा तिथेच बसवावा. यामुळे दोन्ही थोर राजांनी योग्य त्या स्थानावर सन्मानाने स्थान मिळेल,” असेही ते म्हणाले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, जिल्हा संघटक प्रवीण रोकडे, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शहर उपाध्यक्ष संदीप विसंबर, तसेच कार्यकर्ते विनोद शिरसाठ, समीर शेख, मारुती शिंदे आदींच्या सह्या आहेत. हे सर्व पदाधिकारी आजच्या शिष्टमंडळात सहभागी होते.

मनसेने प्रशासनास स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे की, “जर निवेदनाची दखल घेऊन शिवरायांचा पुतळा मूळ ठिकाणी बसवण्यात आला नाही, तर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल.” शहरातील नागरिकांची भावना, ऐतिहासिक वारसा आणि शिवभक्ती यांचे प्रतीक म्हणून हा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे. अलीकडेच नगरपरिषदेने पुतळ्यासाठी इतर पर्यायी ठिकाणांचा विचार सुरू केला असल्याचे वृत्त समोर येताच, मनसेने हा विषय पुन्हा ऐरणीवर आणत प्रशासनावर दबाव वाढवला आहे. शिवाजी चौक हे शहराचे मध्यवर्ती व मुख्य व्यापारी केंद्र मानले जाते. अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवरायांचा पुतळा असावा, अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या मागणीला शहरातील शिवप्रेमी, तरुणवर्ग, इतिहासप्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात यामुळे नव्याने हालचाली सुरू झाल्या असून, या मागणीला राजकीय स्वरूप येण्याची शक्यता वाढली आहे. शिवरायांचे स्मारक ही फक्त मूर्ती नसून, शहराच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या पुढील आंदोलनांची दिशा, इतर राजकीय पक्षांची भूमिका आणि प्रशासनाचा निर्णय यावर येत्या काही दिवसांत या विषयाचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व शिवप्रेमींनी एकत्र येऊन सर्वसमावेशक आणि योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सामाजिक स्तरावरून व्यक्त होत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात आणि संभाजी महाराजांचा पुतळा भाजी मंडईसमोरील स्थळीच — या भूमिकेवर मनसे ठाम असून, याबाबत कोणतीही तडजोड न करण्याची मनःस्थिती त्यांनी स्पष्ट केली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
79 %
3kmh
100 %
Mon
30 °
Tue
26 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!