श्रीरामपूर | प्रतिनिधी :- तालुक्यातील दत्तनगर एमआयडीसी येथे आयोजित 220/33 केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यात एक महत्त्वपूर्ण राजकीय क्षण पाहायला मिळाला. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे जलसंधारण मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांना सार्वजनिकरीत्या दिलेला सल्ला सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय.
विखे पाटील यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आमदार ओगले यांच्याबाबत सौहार्दपूर्ण परंतु स्पष्ट भाषेत मत व्यक्त करत म्हटले की, “काळाच्या ओघात चुकीची संगत ठेवू नका, एवढीच विनंती आहे.” त्यांनी पुढे म्हणत सकारात्मक संकेतही दिले की, “आमदार हेमंत ओगले तुमचं भवितव्य चांगलं आहे, तुम्ही फक्त सोबत राहा.” विखे पाटलांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे क्षण निर्माण झाले, तर राजकीय संकेतही स्पष्टपणे जाणवले. या संपूर्ण घडामोडीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही पक्षांतील वैचारिक मतभेद असूनही, विकासकामांसाठी एकत्रित येण्याची आणि सहकार्याची भूमिका. विखे पाटील यांनी याबाबत ठामपणे सांगितले की, “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, विकासकामासाठी आपण एकत्र राहणार आहोत.” या वक्तव्याने त्यांनी विकासाच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र यावे, असा अप्रत्यक्ष संदेश दिला.
या कार्यक्रमात भाजप, काँग्रेस व इतर पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते. अशा वेळी विखे पाटलांनी दिलेला सल्ला आणि मिश्किल टोला हे राजकीय वातावरणात सौहार्द निर्माण करणारे ठरले. राजकारणात अशा प्रकारची परस्पर संवादाची शैली कमी प्रमाणात पाहायला मिळते. विशेषतः राज्यात सध्या विविध राजकीय समीकरणे बदलत असतानाच्या पार्श्वभूमीवर, विखे पाटलांनी काँग्रेस आमदाराला दिलेला हा सल्ला राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काही जाणकारांच्या मते, हे संकेत आगामी राजकीय समीकरणांची चाहूल देणारेही ठरू शकतात. राजकारणात मतभेद असले तरी विकासासाठी एकत्र येण्याची वृत्ती लोकशाहीला बळकटी देणारी आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. विखे पाटलांनी यावेळी केवळ भूमिपूजन न करता, एक प्रकारची राजकीय सलोखा जपण्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसले. त्यांच्या या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे.