श्रीरामपूर (प्रतिनिधी):- शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, रस्त्यावर होणारी गोंधळाची स्थिती आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करणारी वाहनचालकांची प्रवृत्ती यावर अंकुश ठेवण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी रविवारी विशेष मोहीम हाती घेतली. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभागाचे श्री. सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या सूचनेनुसार शहर पोलीस, RCP पथक, SRP व होमगार्ड यांच्या संयुक्त पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर थेट उतरून कारवाई केली.
मेनरोड, शिवाजी रोड, नेवासा रोड, गोंधवणी रोड या महत्त्वाच्या मार्गांवर सकाळपासूनच पोलिसांची गस्त सुरू होती. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणारी अनेक दुचाकी व चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर बसवलेली वाहने अशा वाहनचालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिसांनी अशा सर्व वाहनांना नियमानुसार योग्य नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिले तर कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर जप्त करून संबंधित वाहनमालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
मोहीमे दरम्यान एकूण ९७ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय रस्त्यावर अनधिकृतपणे लोडगाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांनाही पोलिसांनी कडक ताकीद दिली. पुढील काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि गणेश जाधव, पोसई मेढे, प्रक्षणार्थी पोसई धाराव, पोहेका साळवे, पोहेका सचिन गायकवाड, पोहेका साठे, पोना शिंदे, पोना भडकवाड, पोको आंधळे, पोको अजित पटारे, पोको आजिनाथ आंधळे, पोका सागर बनसोडे, पोका अमोल गायकवाड, पोकॉ लांडे, पोकॉ दुकळे, पोकों अमोल पडोळे, पोकॉ बाळासाहेब गिरी यांच्यासह RCP पथक, SRP पथक आणि होमगार्ड यांचा सक्रिय सहभाग होता. वाहतुकीत शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली असून, शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.




