श्रीरामपूर : महाराष्ट्रातील डाव्या चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ संघर्षशील आणि वैचारिक सहकार्याची वाटचाल करणाऱ्या लाल निशाण पक्षाचा (एल.एन.पी.) औपचारिक विलय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनमध्ये झाला आहे. श्रीरामपूर येथे ३१ मे रोजी पार पडलेल्या ‘ऐतिहासिक एकता संमेलनात’ या विलयाची घोषणा झाली. हा विलय केवळ पक्षांच्या संघटनात्मक पातळीवरील नव्हे, तर महाराष्ट्रातील डाव्या विचारांच्या एकजुटीचा शक्तिशाली निर्धार आहे. या एकता संमेलनास भाकपा (मा-ले) लिबरेशनचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व बिहार विधान परिषदेचे आमदार कॉ. शशि यादव, केंद्रीय सदस्य व अखिल भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर, महिला संघटनेच्या महासचिव कॉ. मीना तिवारी, ग्रामीण कामगार संघटनेचे महासचिव कॉ. धीरेंद्र झा, तसेच बिहार, झारखंड, दिल्ली राज्यांतील सचिव आणि विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. नेहा यांचा समावेश होता.
भा.क.पा. (मा-ले) लिबरेशनचे महासचिव कॉ. दिपंकर भट्टाचार्य यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “एल.एन.पी.चा इतिहास हा महाराष्ट्रातील क्रांतिकारक परंपरेचा भाग आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते ‘भारत छोडो’ आंदोलनातील कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेपर्यंतचा वारसा एल.एन.पी.ने खांद्यावर घेतला आहे. भारतातील विविध भागांतील ऐतिहासिक शेतकरी आणि श्रमिक चळवळी जसे की नक्षलबारी, तेलंगणा, तेभागा – या चळवळीतील मूल्यांना एल.एन.पी. आणि भाकपा-मालेने जपले आहे.” कॉ. दिपंकर यांनी असेही स्पष्ट केले की, “महाराष्ट्र ही जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, तीच भूमी हिंदुत्वाच्या मूळ कल्पनांचा उद्गमस्थानही आहे. त्यामुळे या भूमीतून फासीवादाविरोधातील लढा अधिक प्रभावीपणे उभारणे शक्य आहे.

“लाल निशाण पक्षाचे नेते कॉ. उदय भट यांनी सांगितले की, “आपल्या पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासून कामगार, विद्यार्थी, महिला आणि युवकांच्या चळवळीत भाकपा (मा-ले) लिबरेशनसोबत खांद्याला खांदा लावून कार्य केले आहे. आजचा हा विलय ही त्या ऐक्याची औपचारिक आणि ऐतिहासिक घोषणा आहे.” याचवेळी कॉ. राजाराम सिंग, भाकपा (मा-ले) चे खासदार व अखिल भारतीय शेतकरी महासभेचे सरचिटणीस म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ ही देशभरातील चळवळींना प्रेरणा देणारी आहे. मात्र दुसरीकडे, याच राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. कार्पोरेटांच्या लुटीमुळे शेतकरी संपले जात आहेत.” या एकता संमेलनात कॉ. दिपंकर भट्टाचार्य यांच्या फासीवादविरोधी लिखाणावर आधारित ‘फॅसिस्ट हल्ल्याविरुद्ध एकजुटीचा प्रतिकार संघटित करा’ हे मराठी पुस्तक प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्रात एकजुटीनंतर राज्यस्तरीय भाकपा (मा-ले) अधिवेशन वर्षाअखेरीस होणार असून, त्यासाठी ३६ सदस्यांची तयारी समिती आणि १२ सदस्यांची संचालन समिती तयार करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक क्षणी लाल निशाण पक्षाच्या वतीने अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. त्यामध्ये कॉ. उदय भट, कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. अतुल दिघे, कॉ. मुक्ता मनोहर, कॉ. मेधा थत्ते, कॉ. बी. के. पांचाळ, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. मदीना शेख, कॉ. शरद संसारे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. विकास अळवणी, कॉ. धोंडिबा कुंभार, कॉ. अनंत वायकर व कॉ. शंकरराव पाटील यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील डाव्या चळवळीच्या इतिहासात हे एक दिशादर्शक पाऊल असून, हिंदुत्ववादी फासीवादी शक्तींना रोखण्यासाठी डावे आणि पुरोगामी घटक अधिक संघटितपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार यामधून व्यक्त झाला आहे. फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित ही एकता महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय संघर्षांना नवसंजीवनी देणारी ठरणार आहे.