श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहर व तालुक्यातील नागरिक विविध नागरी व प्रशासकीय समस्यांनी त्रस्त असून, या सर्व प्रश्नांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्यावर ठोस कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असणारे खरेखुरे लोकप्रतिनिधित्व व राजकीय नेतृत्व पूर्णपणे अनुपस्थित असल्याची खंत सामान्य जनतेतून प्रकर्षाने व्यक्त होत आहे. शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, नाल्यांची सफाई, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील त्रुटींच्या बरोबरीने आता तहसील कार्यालयातील रखडलेली प्रकरणे, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी, बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्धतेच्या संधींचा अभाव, तसेच नगर भूमापन कार्यालयातील फेरफार, मोजणी, सातबारा उताऱ्यांसारखी शासकीय कामे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने नागरिक हतबल झाले आहेत.
तहसील कार्यालयात उत्पन्न व जात प्रमाणपत्र, वारस हक्क, निवासी दाखले आदी अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना अनेक दिवस हेलपाटे घालावे लागत असून, कर्मचाऱ्यांची कमतरता, तांत्रिक अडचणी, आणि काही ठिकाणी निष्क्रियतेमुळे नागरिकांची वेळ, श्रम आणि पैसा वाया जात आहे. शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना वेळेत आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया अडथळ्यात येत आहे. अनेक विद्यार्थी पात्र असूनही वेळेत दाखले मिळत नसल्यामुळे उच्च शिक्षणाचे संधी हुकत आहेत. दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील शिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता मार्गदर्शन, व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध न झाल्यामुळे युवक भरकटत आहेत. प्रशासनाकडून अशा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने राजकीय नेतृत्वाकडून दबाव टाकून त्या राबवण्याची अपेक्षा होती, ती पूर्ण होताना दिसत नाही. नगर भूमापन कार्यालयातील कामे – जसे की जमिनीचे फेरफार, मोजणी, म्युटेशन, जमीन सीमांकन इत्यादी – यामध्येही प्रचंड विलंब होत असून अनेक शेतकरी, व्यावसायिक, आणि सामान्य नागरिक ताटकळलेले आहेत. काही जणांनी महिनोंमहिने कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही काम मार्गी लागलेले नाही, अशी तक्रार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, ‘जनतेच्या समस्या कोणी ऐकायच्या?’, ‘शासनाच्या गलथान कारभाराला उत्तर कोणी द्यायचं?’, ‘अधिकाऱ्यांना जाब कोणी विचारणार?’, ‘नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन कोठे जायचं?’ – हे प्रश्न अधिकाधिक तीव्रतेने उभे राहत आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, युवक संघटना हे सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत असले तरी त्यांना राजकीय पाठबळ नसल्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे. कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते जनतेसमोर येतात आणि त्यानंतर गायब होतात, असा रोष नागरिकांमध्ये आहे. “आम्हाला असा नेता हवा जो फक्त भाषणं करणार नाही, तर तहसील, भूमापन, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांसारख्या प्रत्येक विभागात शिरून अधिकार्यांना जाब विचारेल आणि वेळेत काम करवून घेईल,” अशी भावना श्रीरामपूरच्या युवकांनी व्यक्त केली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्काच्या सेवांसाठी आता निष्क्रिय नेतृत्व नव्हे, तर अभ्यासू, सक्रिय, निर्भीड आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेले नेतृत्व उदयास येणे अत्यावश्यक बनले आहे. श्रीरामपूरकरांची एकमुखी मागणी आहे.