Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरमेनरोडवरील बहुचर्चित अतिक्रमित दुकाने हटवली; ५० वर्षांनंतर जागा झाली मोकळी

मेनरोडवरील बहुचर्चित अतिक्रमित दुकाने हटवली; ५० वर्षांनंतर जागा झाली मोकळी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरातील मुख्य वर्दळीच्या मेनरोडवरील खासगी जागेत गेली अनेक दशके असलेली बहुचर्चित अतिक्रमित दुकाने अखेर न्यायालयाने दिलेल्या मुदतीनंतर काल नगरपालिकेने काढून टाकली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि जेसीबीच्या साहाय्याने ही कारवाई पार पडली. गेली पन्नास वर्षे अतिक्रमणाखाली असलेली ही जागा काल मोकळी करण्यात आली. सदर जागेवर सुरुवातीस चप्पल विक्रीसाठी हातगाड्यांवर व्यवसाय सुरू होता. त्यानंतर गेल्या तीस वर्षांपासून अशोक उपाध्ये, रवी गरेला आणि इतर सात दुकानदारांचे लोखंडी मार्केट उभे होते. मात्र काही वर्षांपूर्वी मूळ मालक गुजराती कुटुंबाने जागा इतर दोन प्रतिष्ठित व्यक्तींना विकली. त्यानंतर या अतिक्रमणाविरोधात कायदेशीर लढा सुरू झाला.

न्यायालयाने जागेच्या मालकाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर, दुकानदारांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र तेथेही त्यांना दिलासा न मिळाल्याने न्यायालयाने तीन महिन्यांची पुनर्वसनाची मुदत दिली होती. ही मुदत काल संपली. याच पार्श्वभूमीवर, दुकानदारांनी स्वतःहून दोन दिवसांपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली होती. काल सकाळी अकरा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख संजय शेळके, बांधकाम विभागाचे सूर्यकांत गवळी, उपमुख्याधिकारी तापकिरे यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी, ट्रॅक्टर व इतर कर्मचाऱ्यांसह कारवाई सुरू करण्यात आली. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन अतिक्रमण हटवण्याचे काम नुकसान न करता संयमाने पार पाडण्याचे निर्देश दिले.

दुकानदारांनी शेवटच्या क्षणी दोन तासांची मुदत मागून नुकसान टाळण्याची विनंती केली होती. यावर पालिकेने समजूतदारपणाने प्रतिसाद देत संयम राखला. शेवटी सर्व लोखंडी टपऱ्या व्यवस्थितपणे हटवून जागा मोकळी करण्यात आली. अतिक्रमित दुकानांच्या मागे असलेली मूळ मालकीची जागा कोणाच्या नावावर आहे, यावरून सध्या शहरात अनेक चर्चा सुरू आहेत. पालिकेने या सर्व दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी व्यापारी संकुले उभारण्याचा निर्णय घेतला असून, मेनरोडवरील दुकानदारांनाही त्या अंतर्गत नव्या संकुलात जागा मिळावी अशी मागणी संबंधितांनी केली आहे. ही कारवाई पालिकेच्या नियोजनबद्ध व कायदेशीर अंमलबजावणीचा भाग असल्याने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
broken clouds
25.8 ° C
25.8 °
25.8 °
88 %
2.9kmh
54 %
Thu
26 °
Fri
32 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °

Most Popular

error: Content is protected !!