Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरमुख्य रस्त्यावर झाड कोसळले; वाहतूक ठप्प – प्रशासन झोपले आहे का? –...

मुख्य रस्त्यावर झाड कोसळले; वाहतूक ठप्प – प्रशासन झोपले आहे का? – पै. अर्जुन दाभाडे यांचा सवाल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गोंधवणी गावातील तळ्याजवळील मुख्य रस्त्यावर काल रात्री मोठे झाड कोसळल्याने शहरातील वाहतूक ठप्प झाली आहे. तब्बल १२ तासांनंतरही झाड हटवले गेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकारावर गोंधवणी भागातील सामाजिक कार्यकर्ते पै. अर्जुन दाभाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे तळ्याजवळील रस्त्यावर एक प्रचंड झाड कोसळले. या मार्गाचा वापर दररोज हजारो नागरिक करत असून, अचानक आलेल्या अडथळ्यामुळे शेकडो वाहनचालक अडकून पडले. झाड रस्त्याच्या मध्यभागी कोसळल्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. नागरिक व वाहनचालकांनी याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन केला. या घटनेनंतर तब्बल अर्धा दिवस उलटूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती झालेली नव्हती. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही यंत्रणा स्थलावर पोहोचली नव्हती. त्यामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना पै. अर्जुन दाभाडे म्हणाले की, “प्रशासन झोपेत आहे का? एवढ्या मोठ्या झाडामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला असूनही अद्याप कोणतीही तातडीची कारवाई झालेली नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे फक्त सामान्य वाहतुकीसाठीच नव्हे तर अॅम्ब्युलन्स, अग्निशमन व पोलीस वाहनांसाठीही महत्त्वाचा मार्ग आहे. उद्या कोणतीही आपत्कालीन घटना घडली असती, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” पुढे बोलताना त्यांनी झाड तत्काळ हटवून वाहतूक सुरळीत करण्याची, तसेच शहरातील धोकादायक झाडांची यादी तयार करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली. “जर प्रशासनाने वेळेत कार्यवाही केली नाही, तर नागरिकांचा रोष उफाळून येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

या संदर्भात मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सदर घटनेची माहिती मिळताच आमच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. झाड हटवण्याचे काम सुरू असून, लवकरच रस्ता मोकळा करण्यात येईल.” त्यांनी या प्रकाराची दखल घेऊन पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले. शहरात अनेक ठिकाणी जुनी, वाकलेली किंवा धोकादायक स्थितीत असलेली झाडे मोठ्या संख्येने आहेत. पूर्वी अनेकवेळा नागरिकांनी अशा झाडांबाबत तक्रारी केल्या असूनही प्रशासनाकडून यावर फारसा पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे अशा अपघातांची शक्यता नेहमीच राहते.

RELATED ARTICLES
Jharkhand
broken clouds
25.8 ° C
25.8 °
25.8 °
88 %
2.9kmh
54 %
Thu
26 °
Fri
32 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °

Most Popular

error: Content is protected !!