Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरमा. आ. भानुदास मुरकुटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री शिंदेंचा...

मा. आ. भानुदास मुरकुटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री शिंदेंचा उबाठा गटावर घणाघात

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – “एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) गटावर घणाघात करत महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकार हे स्थगिती नव्हे, तर प्रगती व समृद्धीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार केला.

शनिवारी श्रीरामपूर तालुक्यातील माजी आमदार भानुदास मुरकुटे, नीरज मुरकुटे, गणेश छल्लारे, प्रवीण फरगडे, संजय छल्लारे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत, भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, प्रवक्ते राहुल लोंढे हे देखील मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही आणल्या — लाडकी बहिण, लाडका भाऊ, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवल्या. त्याच विश्वासाच्या बळावर महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळाले.” “सध्या महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेताना ‘सर्वसामान्य माणूस’ केंद्रस्थानी ठेवला आहे. महाराष्ट्राची प्रगती, औद्योगिक वाढ आणि सामाजिक समरसता हेच आमचे ध्येय आहे,” असेही शिंदे म्हणाले.

या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतलं ते नीरज मुरकुटे यांच्या प्रवेशाने. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नातू नीरज यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याबद्दल शिंदे म्हणाले, “समाजहितासाठी उच्चशिक्षित पिढीने राजकारणात सक्रीय भाग घेणं ही काळाची गरज आहे. नीरज मुरकुटे यांच्यासारखे तरुण हे पक्षाला बळकटी देणारे आहेत.” याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अलीकडील परदेश दौऱ्याचा विशेष उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत यांनी चार देशांच्या दौऱ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्या चारही देशांनी भारताला पाठिंबा देत पाकिस्तानला विरोध दर्शवला,” असे त्यांनी स्पष्ट केले. या भव्य पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील असंख्य माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा या सोहळ्यात सहभाग होता. यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!