दत्तनगर (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त एक आगळावेगळा आणि उत्साहवर्धक सांस्कृतिक उपक्रम दत्तनगरमध्ये साकारत आहे. येत्या रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ या खास महिलांसाठी आयोजित कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, या अनोख्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात चैतन्याची लहर निर्माण केली आहे.
श्रीरामपूर तालुक्यात प्रथमच होत असलेल्या क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा मंडळाच्या वतीने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य नाना शिंदे व मा. सभापती पंचायत समिती सदस्या संगिता शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोरील प्रशस्त मैदानावर होणार असून, महिलांसाठी हे एक खास सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.
या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक व रंजनात्मक खेळ, ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी तब्बल २५१ पैठणी साड्या, फ्रीज, एलइडी टीव्ही, कुलर, शेगडी, फॅन, पाण्याच्या बाटल्या, टुरिस्ट बँग्स, जेवणाचे डबे या व्यतिरिक्त अनेक बक्षीसे या कार्यक्रमात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये या कार्यक्रमाबाबत विशेष आकर्षण व उत्साह पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमाच्या कला प्रस्तुतीसाठी बालगायिका आणि टीव्ही कलाकार सह्याद्री मळेगावकर यांचे विशेष सादरीकरणही आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. या उपक्रमासाठी जनसेवा मंडळाने काटेकोर नियोजन केले असून, सहभागी महिलांसाठी सर्व आवश्यक सुविधा – सुरक्षितता, बसण्याची व्यवस्था, पाणी, प्रसाधनगृह यांचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
‘खेळ पैठणीचा’ हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून, महिलांना त्यांच्या नित्याच्या जबाबदाऱ्यांतून विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरणाऱ्या या उपक्रमाबाबत स्थानिक महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून येतो. या उपक्रमाविषयी बोलताना श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता शिंदे यांनी असे सांगितले की, “महिलांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून काही क्षण विरंगुळ्याचे आणि आनंदाचे मिळावेत, यासाठी अशा कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे.
“या उपक्रमामुळे जनसेवा मंडळाची सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी अधोरेखित होते. सामाजिक, धार्मिक उपक्रमांनंतर महिला सशक्तीकरणाला वाहिलेला हा उपक्रम एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. दत्तनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह या कार्यक्रमास उपस्थित राहून, या सांस्कृतिक आनंदसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक जनसेवा मंडळाने केले आहे.