श्रीरामपूर (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा शहरातील मुख्य चौकात बसवण्याच्या मागणीवरून श्रीरामपूर शहरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून, भाजपच्या आजी-माजी शहराध्यक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांनी शहरातील तणाव वाढवला आहे. विशेषतः जैन समाजातील दोन माजी स्वीकृत नगरसेवक, भाजपचे माजी व विद्यमान शहराध्यक्ष यांच्यातील वादामुळे समाजात मोठी दुफळी निर्माण झाली आहे. २०१६ मध्ये नगर परिषदेच्या सत्तांतरावेळी जैन समाजाचा महत्त्वाचा सहभाग होता. तत्कालीन भाजप शहराध्यक्ष किरण लुणिया यांना भाजपतर्फे स्वीकृत नगरसेवकपद मिळाले, तर जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती काँग्रेसच्या फुटीर गटामधून स्वीकृत नगरसेवक म्हणून झाली होती. त्या काळात नगर परिषदेत सुसंवादाचे वातावरण होते. त्यानंतरच्या तीन वर्षांच्या प्रशासकीय काळातही कोणतेही मोठे वाद उद्भवले नव्हते. मात्र, पुढील काळात काँग्रेसच्या नगरसेवकांचा मोठा गट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शहराध्यक्षपदावरून मतभेद वाढले, आणि याचे पडसाद आता प्रकर्षाने दिसू लागले आहेत.
अलीकडेच शिवाजी महाराज पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भाजी मंडईला होणारा विरोध अधोरेखित करून विद्यमान भाजप शहराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक जितेंद्र छाजेड यांनी मोर्च्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना माजी शहराध्यक्ष व माजी स्वीकृत नगरसेवक किरण लुणिया यांनी जोरदार पलटवार करून त्यांच्यावर आरोपांची फैज फेकली. यामुळे भाजप आणि जैन समाजामध्ये खुलेपणाने गटबाजी समोर आली असून सामाजिक स्तरावरही वातावरण तापले आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण सामंजस्याने सोडवावे, अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा, शिवाजी महाराज पुतळा बसवण्याच्या मागणीवरून सुरू झालेला हा वाद भविष्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, अशी भीतीही व्यक्त होत आहे. एकूणच, सामाजिक आणि राजकीय पातळीवर हे प्रकरण चिघळत चालल्याने श्रीरामपूरच्या वातावरणात अस्वस्थता वाढली आहे. आगामी काळात हे प्रकरण कशा वळणावर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.