श्रीरामपूर (प्रतिनिधी): नगरपालिकेतील प्रशासकीय शिस्त दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी लेखापाल व निवृत्त अभियंता यांच्यात झालेल्या जोरदार झगड्याचे प्रकरण अजूनही लोकांच्या लक्षात असताना, आता पुन्हा एकदा दोन महिला अधिकाऱ्यांमधील हमरीतुमरीने नगरपालिकेतील वातावरण चांगलेच तापवले आहे. यावेळी लेखा विभागातील एका जबाबदार महिला अधिकाऱ्याशी दुसऱ्या विभागातील सहाय्यक पदावरील महिला अधिकाऱ्याने थेट लेखा कक्षात जाऊन वाद घातल्याचा प्रकार घडला आहे.
ही घटना गेल्या आठवड्यात घडली. याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे श्रीरामपूर दौऱ्यावर आले होते. बहुतांश पालिका अधिकारी त्यांच्यासोबत क्षेत्रभेटीवर गेले होते. याचदरम्यान लेखा विभागात हा प्रकार घडल्याचे समजते. वाद घालणारी महिला अधिकारी ही काही वर्षांपूर्वी निलंबित झाली होती. त्या काळातील काही बिले लेखाविभागाकडे अलीकडेच सादर करण्यात आली होती. मात्र लेखाविभागाने या बिलांना नकार दिला. या नकाराचा राग मनात धरून संबंधित महिला अधिकारी लेखा विभागात आली आणि उपस्थित असलेल्या जबाबदार महिला अधिकाऱ्याशी वादावादी सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघींमध्ये वैयक्तिक आरोप, शिवीगाळ, तसेच चारित्र्यावरही शिंतोडे उडवले गेले, अशी चर्चा कर्मचारी वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वाद घालणाऱ्या महिला अधिकाऱ्याविरोधात अनेक तक्रारी पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या आहेत. नागरिकांशी गैरवर्तन, सहकाऱ्यांशी उर्मट वागणूक, वारंवार वाद घालणे, अशा स्वरूपाच्या तक्रारींसोबतच एका सामाजिक संस्थेनेही त्यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने सध्या पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी चौकशी सुरू केली असून, विशेष बाब म्हणजे या चौकशी समितीत लेखाविभागातील दोन महिला अधिकारी सहभागी आहेत. वादावादी करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने याच गोष्टीचा राग काढत त्या महिला अधिकाऱ्याशी उद्दामपणे वर्तन केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या महिला अधिकाऱ्याला तिचे सध्याचे पद बढतीद्वारे मिळाले असून, ही बढती सरळसेवेच्या नियमांचे उल्लंघन करत मिळवण्यात आली, असा आरोपही संबंधित तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी अधिक गांभीर्याने केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे काही महिन्यांपूर्वी पालिकेचे तत्कालीन लेखापाल आणि एक निवृत्त अभियंता यांच्यात जोरदार भांडण झाले होते. हे प्रकरण खुर्च्या एकमेकांच्या दिशेने फेकण्यापर्यंत गेले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण शांत केले होते. मात्र त्या घटनेनंतरही पालिकेतील आंतरिक वातावरण सुधारले नाही, हे सद्यस्थितीत पुन्हा स्पष्ट झाले आहे.
पालिका प्रशासनात सध्या पूर्णपणे प्रशासकीय राजकारणाचे सावट पसरले असून, अधिकाऱ्यांवर कुणाचाही वचक उरलेला नाही, अशी भावना कर्मचारी व्यक्त करीत आहेत. प्रशासक मंडळात पुरेशा शिस्तीचा अभाव असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी एकमेकांशी वाद घालण्यास मोकळे असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप म्हणाले की, “जिल्हाधिकारी दौऱ्यावर असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्या दिवशी असे काही घडल्याचे कानावर आले आहे, मात्र नक्की कारण स्पष्ट झालेले नाही. माझ्याकडे लेखी तक्रार आली तर निश्चित चौकशी करण्यात येईल.” त्यांच्या या वक्तव्याने प्रशासन सजग असल्याचा संदेश दिला असला, तरी आतापर्यंत केवळ चौकशीची आश्वासने मिळत आहेत, कृती दिसून येत नाही, अशी नाराजी कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.