श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांतील महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या मांडण्यात आल्या असून, नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी नागरिकांच्या वतीने दिलेल्या अनेक मागण्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमातच मान्यता मिळाल्याने जनतेत समाधानाची लाट उमटली आहे. विशेषतः उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल दरम्यानचा नाला (चर) हा परिसरातील प्रमुख समस्या बनला होता. सततच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी, रोगराई आणि अस्वच्छतेची स्थिती निर्माण होत होती. या नाल्याचे सिमेंट काँक्रेटीकरण करून भूमिगत करण्याची मागणी नगरसेविका सौ. स्नेहल खोरे यांनी ठामपणे पुढे रेटली. पालकमंत्री विखे पाटील यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक किरण सावंत यांना प्रस्ताव सादर करून त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे प्रभागातील नागरिकांना कायमस्वरूपी या त्रासातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे परिसराचा आरोग्य व स्वच्छता स्तर उंचावेल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. याच कार्यक्रमात नगरसेविका स्नेहल खोरे यांनी भोंगळ वस्तीतील पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्याची, पूर्णवादनगर टीपी रिझर्व्हेशन काढण्याची आणि प्रभागासाठी वाढीव निधी मंजूर करण्याची विनंतीही केली. या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पूर्णवादनगरमधील टीपी रिझर्व्हेशनचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यात अडचणीमुळे स्थानिकांना घरकुल, रस्ते आणि नागरी सुविधा देण्यात अडथळे येत होते. हा प्रश्न मार्गी लागल्यास, परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा विकसित होण्याचा मार्ग मोकळा होईल. या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या. विशेष म्हणजे, नागरिकांनी नगरसेविका स्नेहल खोरे यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त करण्यात आली. प्रभागाच्या विकासासाठी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील हे देखील सातत्याने कार्यरत असून, त्यांनी नागरिकांच्या अडचणी स्थानिक स्वराज्य संस्था व शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांमुळे या परिसरात सामाजिक एकात्मता वाढल्याचे चित्र आहे.
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरच्या प्रभागांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील. नागरिकांच्या मागण्या अत्यंत योग्य असून, त्या तातडीने मार्गी लावल्या जातील.” त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, “नाल्याच्या भूमिगतकरणासह इतर प्रस्ताव तातडीने मंजूर करून कामांना सुरुवात करावी.” या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून फक्त विकासकामांचा उद्घाटन नव्हे, तर नागरिकांच्या मुख्य समस्या सोडवण्याचा ठोस निर्णय घेतल्याचे चित्र दिसून आले. नगरसेविका सौ. स्नेहल खोरे यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक प्रश्नांसाठी दाखवलेला आग्रह आणि त्याला मिळालेले शासनाचे तात्काळ उत्तर, हे लोकशाहीत लोकप्रतिनिधींच्या प्रभावी कामगिरीचे उदाहरण ठरते. प्रभागातील नाल्याचे भूमिगतकरण, पाईपलाईन, टीपी रिझर्व्हेशन आणि निधीवाढ अशा चारही महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याने प्रभागाचा चेहरामोहरा लवकरच बदलण्याची चिन्हे आहेत. जनसेवेला मिळालेले हे बळ हे जनतेच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणाऱ्या नेतृत्वाचे उत्तम उदाहरण ठरते. पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे आणि नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या सातत्यामुळे हा प्रभाग आता नव्या विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन दिनकर, माजी सभापती दीपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, प्रशासक किरण सावंत, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे, उपनगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांच्यासह रवी पाटील, आशिष धनवटे, श्रीनिवास बिहानी, शशांक रासकर, जयश्री शेळके, भारती कांबळे, पुष्पलता हरदास, शामलिंग शिंदे, मनोज लबडे, कैलास दुबय्या, सनी सानप, बंडू कुमार शिंदे, संजय गांगड, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, सोमनाथ गांगड यांच्यासह शहरातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.