श्रीरामपूर/प्रतिनिधी:– तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजले जाणारे दत्तनगर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात एक उत्साहाचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण होत आहे.
दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते व अत्यंत लोकप्रिय निवेदक क्रांती नाना मळेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या खास शैलीत कार्यक्रमाला वेगळीच झळाळी प्राप्त होणार असून, ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता आहे.या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य नाना शिंदे तसेच माजी सभापती संगिता शिंदे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी एकत्र यावे आणि आपल्या हक्कांसाठी जागरूक व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सांस्कृतिक सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे दत्तनगरमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. यापूर्वी गावात १०१ घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी काँग्रेसच्या सरपंच सारिका कुंकलोळ यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर शहरातील १२ नगरसेवक भाजप मध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत फूट आणि ग्रामपंचायतीतील काही सदस्य भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तनगर ग्रामपंचायतीतील काही सदस्य भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकत आहेत. एका ग्रामपंचायत सदस्याने याला दुजोरा दिल्याने या चर्चांना अधिक बळकटी मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात गावातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘खेळ पैठणीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तनगरमध्ये केवळ एक सांस्कृतिक उत्सव साजरा होत नसून, आगामी राजकीय हालचालींनाही नवसंजीवनी मिळत आहे. गावातील राजकीय समीकरणे कशी बदलतील आणि सुजय विखे यांची पुढची राजकीय ‘गुगली’ काय असेल, याकडे सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. राजकारणात काहीही शक्य असते, असे जाणकारांचे म्हणणे असून, दत्तनगरमधील आगामी घडामोडी तालुक्यातील एक नवा राजकीय अध्याय घडवू शकतात, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.