श्रीरामपूर (प्रतिनिधी) – भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी काल प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या खुलाशावर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. “आमच्याकडे काही महिलांनी दिलेल्या गंभीर लेखी तक्रारीच्या आधारे आम्ही राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे अधिकृतपणे तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणाचीही बदनामी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे स्पष्ट वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केले आहे.
तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, “या प्रकरणातील व्हायरल व्हिडिओ संदर्भात नितीन दिनकर यांचे स्वतःचे स्पष्टीकरणच विरोधाभासी आहे. त्यांनी जो व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी अपलोड केल्याचे म्हणत आहेत, तो व्हिडिओ त्यांच्या कोणत्याही अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सापडत नाही. शिवाय, व्हिडिओमध्ये ते महिलांबरोबर नाचताना व दारू प्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ कधी अपलोड केला नव्हता असे म्हणणे आणि व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे सांगणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.” “आम्ही ज्यांच्याकडून तक्रारी घेतल्या आहेत त्या महिला प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटनेची साक्ष देतात. त्या महिला कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे तर आपल्या आत्मसन्मानासाठी व सुरक्षिततेसाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागणीनुसार पुढाकार घेतला असून लवकरच या सर्व तक्रारकर्त्या महिलांना घेऊन आम्ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार आहोत. त्यांना या प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती दिली जाईल व आवश्यक ती कारवाई मागितली जाईल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
तृप्ती देसाई यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण प्रकरणात आणखी गंभीर वळण येण्याची शक्यता असून, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर राजकीय आणि सामाजिक दडपण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः सामाजिक कार्यकर्त्या व महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने प्रशासनाकडून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीसाठी मागणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नितीन दिनकर यांच्याविरोधात सादर करण्यात आलेली तक्रार ही केवळ सोशल मीडियावरील व्हिडिओपुरती मर्यादित नसून, महिलांवरील मानसिक दबाव व गैरवर्तनाचेही गंभीर आरोप या तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणाकडे कशाप्रकारे लक्ष दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.