श्रीरामपूर/प्रतिनिधी – श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक परमपूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी श्रीरामपूर शहरातील श्री शिवाजी महाराज चौकातच शिवमूर्तीची स्थापना झाली पाहिजे, अशी स्पष्ट व ठाम भूमिका मांडली आहे. या संदर्भात श्रीरामपूरहून श्रीगोंदा येथे भेटीस गेलेल्या हिंदू रक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळासमोर ते बोलत होते. सध्या शिवमूर्तीची जागा बदलण्याचा प्रस्ताव चर्चेत असून, यावर भिडे गुरुजींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भिडे गुरुजी म्हणाले, “तिकडे काश्मीरमध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घालतात आणि इकडे आपण मुस्लीमांच्या दबावाखाली हिंदू समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करतो. गावात जिथे श्री शिवाजी महाराज चौक आहे, तिथेच मूर्तीची स्थापना झाली पाहिजे.” यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि ना. विखे पाटील यांच्यावरही थेट टीका करत सांगितले की, “ते कोणत्याही पदावर असले तरी हिंदू समाजाच्या भावना प्राधान्याने ऐकल्या गेल्या पाहिजेत.
“श्रीगोंदा येथे आलेल्या भिडे गुरुजींचे एकत्रिकरणासाठीचे भाषण अत्यंत प्रेरणादायी ठरले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “फक्त मुस्लिम वसाहत जवळ आहे म्हणून मूर्तीची जागा बदलणे, हे लांगुलचालन असून ते कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही.” त्यांनी असा इशाराही दिला की, “हा विषय आता केवळ श्रीरामपूरपुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा विषय बनलेला आहे.”भविष्यात संघर्ष अटळ असल्याचे सूचित करत भिडे गुरुजी म्हणाले, “हिंदू समाजाच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही, तर आपण आंदोलनाच्या मार्गावर जावे लागेल. हे केवळ भावनिक नव्हे, तर संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे आंदोलन असेल.
“श्रीगोंदा येथे झालेल्या या बैठकीत श्रीरामपूर येथील शिवप्रतिष्ठानचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब थोरात, तसेच सुरेश सोनवणे, दीपक डावकर, भारत शेळके, सोमनाथ कदम, संजय यादव, सोमनाथ पतंगे, सिद्धार्थ साळवे, अक्षय नागरे आणि दर्शन चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळाने भिडे गुरुजींना श्रीरामपूर शहरात सध्या सुरू असलेल्या मूर्तीस्थापनेच्या वादाबाबत सविस्तर माहिती दिली.
भिडे गुरुजींनी या वादावर आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “हिंदू समाजाची मागणी हीच खरी लोकशाहीची पायाभूत बाब आहे. लोकांच्या भावना पायदळी तुडवून मुस्लिमसंघटनांचा विचार करणाऱ्या कोणत्याही राजकीय नेत्याला जनतेने जागेवर आणले पाहिजे.” या संपूर्ण प्रकरणामुळे श्रीरामपूर परिसरात नव्याने धार्मिक व सामाजिक चर्चेला सुरुवात झाली असून, या विषयावर राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीगोंदा येथे भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाने हिंदुत्ववादी संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे आणि मूर्तीस्थापनेसाठी व्यापक पातळीवर संघर्षाचे संकेत मिळाले आहेत.