श्रीरामपुर/प्रतिनिधी:– तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली ‘हर घर जल’ योजना सध्या ठप्प अवस्थेत आहे. योजना महत्त्वाकांक्षी असली तरी तिची अंमलबजावणी मात्र धोकादायक आणि निष्काळजीपणाचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे. महिन्यांपासून काम थांबलेले असून, अपूर्ण बांधकाम, तुटलेले सुरक्षा कठडे आणि रस्त्यालगत साचलेले पाणी – या सगळ्याचा नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत आहे.

तळ्याजवळील आगाशे नगर भागात खोदण्यात आलेली कामे आज अपूर्ण अवस्थेत उभी आहेत. कालव्याचे आवर्तन सुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, याच मार्गावरून नागरिक व शालेय विद्यार्थी दररोज ये-जा करत असतात. एक चुकीचा पाऊल किंवा वाहनाचा ताबा सुटल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेच्या नावाखाली बसवलेले तात्पुरते पत्र्याचे कठडे सध्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. ना रक्षक, ना सूचना – एकीकडे योजना ‘हर घर जल’ म्हणते, पण त्याआड ‘घराघरात भय’ पोहोचवते आहे. नागरिकांनी ही बाब वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मांडली. मात्र, ‘हे काम जलजीवन मिशन अंतर्गत आहे’ असा पवित्रा घेऊन प्रशासन जबाबदारीपासून पळ काढत आहे. ठेकेदाराचाही या भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. एकीकडे सरकारने पाण्याच्या सुविधेसाठी मोठे बजेट जाहीर केले, योजनांचे उद्घाटन जल्लोषात झाले, पण प्रत्यक्षात नागरिकांना मिळाले असुरक्षिततेचे भय.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, जर उद्या एखादा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ठेकेदार? ग्रामपंचायत? की जलजीवन मिशनचे अधिकारी? आज एकमेकांवर जबाबदारी टाकणाऱ्या यंत्रणांनी हा प्रश्न गंभीरपणे घेतला पाहिजे. अपघात घडल्यावर ‘दोषी कोण?’ हे शोधण्यापेक्षा आजच ‘दोष कुठे आहे?’ हे शोधून तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे काही मूलभूत मागण्या केल्या आहेत – सुरक्षा कठडे दुरुस्त करावेत, तातडीने रक्षक नेमावेत, कामासाठी ठोस वेळापत्रक जाहीर करावे, आणि नागरिकांच्या सहभागातून देखरेख समिती स्थापन करावी. या मागण्या कायद्याच्या चौकटीत असून पूर्णपणे योग्य आहेत. शासनाच्या योजना या केवळ घोषणांपुरत्या मर्यादित राहता कामा नये. त्यांची अंमलबजावणी वेळेत, योग्य नियोजनानुसार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या निकषांवर आधारित असली पाहिजे. दत्तनगरमधील स्थितीवरून प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो.