श्रीरामपूर (प्रतिनिधी) – सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांच्या सादरीकरणातील न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमास दत्तनगरकर महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संविधान कॉलनीजवळील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या मैदानात २७ एप्रिल रोजी रात्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य नाना शिंदे आणि मा. सभापती संगिता शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाने तालुक्यात महिलांसाठी नवा उपक्रम म्हणून विशेष आकर्षण निर्माण केले. तळ्यात-मळ्यात, फुगे फोडणे, प्रश्नोत्तरे, उखाणे व नृत्य आदी विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, भाऊजींच्या विनोदी व कल्पक सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांती नाना मळेगावकर यांच्या भीम वंदनेने झाली. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मा . खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, भाजपा नेते संजय फंड, मा. भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे, आर. पी. आय. उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शरद नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, भाजपा महिला आघाडी मंजुश्री ढोकचोळे,आर पी आय चे विभागीय अध्यक्ष भिमराज बागुल, शहराध्यक्ष विजय पवार, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, संजय गांगड, केतन खोरे, रवी पाटील, स्वामीराज कुलथे व शामलिंग शिंदे आदींची उपस्थिती होती.मा. सभापती संगिता शिंदे यांनी प्रास्ताविकातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जनसेवा मंडळाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. महिलांनी उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करावी तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचा संदेश द्यावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाना शिंदे यांनी कार्यक्रमात आशा वर्कर, डॉक्टर, समाजसेविका, नर्सिंग स्टाफ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, दत्तनगर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच, उपसरपंच व सदस्या, दत्तनगर गावातील समाजसेविका व शासकीय क्षेत्रातील महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात दत्तनगर भागातील तीन बचत गटांना स्वयंनिर्भरतेसाठी प्रत्येकी १२८००० रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे औपचारिक सूत्रसंचालन प्रविण जमधडे यांनी केलं होतं. संपूर्ण कार्यक्रमात महिलांचा जोश, प्रतिसाद आणि भाऊजींची अद्वितीय सादरीकरणशैली यामुळे दत्तनगरमध्ये एक अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा अनुभवायला मिळाला.

मिना सुनिल मरकड ठरल्या होम मिनिस्टर
न्यू होम मिनिस्टर स्पर्धेत मिना सुनिल मरकड ह्या होम मिनिस्टर ठरल्या. त्यांनी फ्रिज हे प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय पारितोषिक असलेली एलईडी टीव्ही निकिता नविन क्षीरसागर यांना मिळाली. तर अरुणा आकाश रंधे यांना तृतीय क्रमांकाचे कुलर पारितोषिक देण्यात आले. याशिवाय २५१ मानाच्या पैठण्या आणि सहभागी प्रत्येक स्पर्धकास आकर्षक अशा एकूण ४६ भेट वस्तू देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरपीआय नेते भीमा बागुल, राजेंद्र मगर, संजय बोरगे, सचिन ब्राह्मणे, संदीप मगर, जनाभाऊ खाजेकर, शरद भणगे, प्रदीप गायकवाड, पंकज बागुल, शुभम पगारे, राजेंद्र खाजेकर, संदीप बागुल, सतीश ब्राह्मणे, डॉ. सुधीर ब्राह्मणे, अनिल जगताप, आनंद चावरे, प्रशांत सरोदे, बाबा जाधव, नाना जाधव, विशाल सरोदे, शकील भाई बागवान, सुरेश शिवरकर याप्रमाणे अष्टविनायक मित्र मंडळ, मॉर्निंग क्रिकेट क्लब, आंबेडकर वसाहत मित्र मंडळ, आरंभ सामाजिक प्रतिष्ठान, समता प्रतिष्ठान, श्री दत्त तरुण मंडळ, शिवसाई प्रतिष्ठान यांनी परिश्रम घेतले.

संगीताच्या तालावर महिलांचा ठेका भाऊजी क्रांती नाना मळेगावकर यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना खिळवून ठेवले. कधी स्टेजवरुन तर कधी प्रत्यक्ष श्रोत्यांत जाऊन त्यांनी उपस्थित महिलांना प्रोत्साहित केले. महिला, युवती, वयस्कर महिलांसह चिमुकल्या मुलींनी सुद्धा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. संगिताच्या तालावर महिलांनी चांगलाच ठेका धरला आणि चिमुकल्या सह्याद्रीच्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.