Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरगणपती विसर्जनासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन सज्ज

गणपती विसर्जनासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन सज्ज

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरात दहा दिवस गणरायाच्या आगमनाचा जल्लोष अनुभवून शनिवारी (ता. ६) अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेसह पोलीस प्रशासनाने मोठी तयारी केली असून संपूर्ण शहरात सुरक्षा आणि सुविधा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या वतीने २५० हून अधिक मनुष्यबळ तैनात केले असून पोलीस विभागाकडून तब्बल २७० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी शहरातील संत गाडगेबाबा मंदिर, कांदा मार्केट पाठीमागे व थत्ते ग्राउंड येथे कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच नॉर्दन ब्रांच, दहावा ओटा, अक्षय कॉर्नर, काळाराम मंदिर, दळवी वस्ती, सरस्वती कॉलनी कॅनॉल ब्रिज, गोंधवनी रोड कॅनॉल ब्रिज, खबडी कॅनॉल ब्रिज व महानुभव आश्रम कॅनॉल ब्रिज या ठिकाणी विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या मूर्तींसाठी शिरसगाव येथे स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निर्माल्य नदी किंवा तलावात टाकू नये यासाठी जागोजागी निर्माल्य कलश ठेवले आहेत. अग्निशमन विभागाकडून लाईफ जॅकेट, रिंग, गळ, बोट, मेगाफोन, दोरी आदी रेस्क्यू साहित्य आणि पथके सज्ज असून जीव रक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून विसर्जन आनंदी वातावरणात करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्यावतीनेही प्रभागनिहाय आरोग्य पथके नियुक्त केली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, शहरात सहा हजारांहून अधिक सार्वजनिक व घरगुती मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ११ अधिकारी, ६७ पोलीस कर्मचारी, ६८ होमगार्ड, ३० आरसीपी, ३५ एसआरपी असा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरी, महिलांची छेडछाड यांसारखे प्रकार रोखण्यासाठी गस्ती पथके तैनात केली जाणार आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस विविध चौकात तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. एकूणच, शहरातील नगरपालिका व पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीमुळे गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत व आनंदात पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!