श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील भाजपाचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या सखोल चौकशीची मागणी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपाली चित्ते आणि पुत्र प्रतिक चित्ते यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणात राजकीय हेतूने प्रेरित कारस्थान असल्याचा ठपका त्यांनी ठेवला असून, सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात सौ. दिपाली चित्ते यांनी स्पष्टपणे नमूद केले की, संबंधित तक्रारदाराने रात्री पावणे आठ वाजता दिलेल्या पहिल्या तक्रारीत ना प्रकाश चित्ते यांचे नाव होते, ना कोणतेही जातीयवाचक उल्लेख होते. मात्र, त्यानंतर रात्री एक वाजता दुसऱ्यांदा तक्रार देत काल्पनिक घटनांचा आधार घेत जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. ही बाब संशयास्पद असून, ती पूर्वनियोजित कटकारस्थानाचे सूचक आहे, असा आरोप त्यांनी केला. विशेष बाब म्हणजे, अशा प्रकारच्या गंभीर आरोपांवर प्राथमिक चौकशी होणे अपेक्षित असताना, स्थानिक पोलीस प्रशासनाने कुठल्याही शहानिशा किंवा वस्तुनिष्ठ तपासाशिवाय तातडीने ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. ही कृती निष्काळजीपणाची असून प्रशासनावर राजकीय दबाव होता, असा आरोप प्रतिक चित्ते यांनी यावेळी केला.
या पार्श्वभूमीवर सौ. दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करत सांगितले की, या प्रकरणात वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. खोट्या आरोपांमुळे केवळ व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची मानहानी होते. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणेही अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी निवेदन स्वीकारून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे समजते. दरम्यान, प्रकाश चित्ते यांच्या समर्थकांमध्येही या खोट्या गुन्ह्यामुळे तीव्र संतापाची भावना असून, पोलिसांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरमधील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी जलदगतीने पार पडावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.