श्रीरामपूर (प्रतिनिधी) – “अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना माझ्यापाशी थारा नाही,” असा स्पष्ट इशारा अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, “श्रीरामपूर शहराची एकेकाळी गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे ‘मिनी मुंबई’ म्हणून ओळख होती. मात्र सध्या परिस्थिती पूर्वीपेक्षा नक्कीच सुधारली आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. शहरातील गुन्हेगारी संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी माझ्याकडून कठोर पावले उचलली जात आहेत.” अवैध धंद्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या भूमिकेवर भर देताना त्यांनी सांगितले, “जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असतील, तर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यावर कारवाई करावी. कोणीही अवैध धंद्यांना पाठीशी घालू नये. जर असे प्रकार समोर आले, तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
श्रीरामपूर शहरात सध्या गावठी कट्टे व मोटरसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याबद्दल विचारले असता, पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले की, “मी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गावठी कट्टे नेमके कुठून येतात याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. यासाठी कोंबिंग ऑपरेशन, तपासणी मोहिमा, आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाईचे आदेश दिले आहेत.” यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे यांनी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “पोलीस आणि जनतेमधील परस्पर समन्वयामुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावता येईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कुठल्याही प्रकारच्या अवैध धंद्याची, संशयास्पद हालचालीची माहिती पोलिसांना देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.” शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभाग अधिक तत्पर असून, भविष्यात अशा प्रवृत्तीच्या लोकांना वचक बसेल, अशी कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पत्रकारांना आश्वस्त केले की, “शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे. नागरिकांनीही पोलीस विभागावर विश्वास ठेवावा व आपले सहकार्य कायम द्यावे.”