Homeमहाराष्ट्रराहतानऊ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा...

नऊ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल – राजीनाम्याची मागणी

राहाता (प्रतिनिधी): प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील नऊ कोटी रुपयांच्या बोगस कर्जमाफी प्रकरणात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह एकूण ५४ जणांविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत राधाकृष्ण विखे यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. ही कारवाई तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर करण्यात आली आहे. कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब विखे यांनी २००४-०५ व २००७ या कालावधीत कारखान्याच्या संचालक मंडळाने युनियन बँक ऑफ इंडिया व इतर बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज घेतल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस ठाण्याने ती तक्रार नोंदवून न घेतल्याने त्यांनी थेट राहता येथील न्यायालयात धाव घेतली.

राहता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत भारतीय दंड संहिता कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात संचालक मंडळाने औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकताच राहता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत २८ एप्रिल २०२५ रोजी लोणी पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ४१५, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४७१, ३४ व १२० (ब) अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, संगनमताने अपहार आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

या बोगस कर्ज प्रकरणात कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल नऊ कोटींचे कर्ज घेतले, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्याला ते कर्ज दिले गेले नाही. नंतर २००९ मध्ये कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत या रकमेची माफी मिळवून कारखान्याच्या फायद्यासाठी शासनाची फसवणूक करण्यात आली. लेखापरीक्षणात हे प्रकरण उघड झाले असून शासनाने २०१२ मध्ये कारखान्याकडून व्याजासह रक्कम परत मागितली होती.

ही संपूर्ण कारवाई बाळासाहेब विखे, अ‍ॅड. सुरेश लगड, अरुण कडू, एकनाथ घोगरे आदींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली. त्यांनी सादर केलेले पुरावे, न्यायालयीन लढा व जनहितातील संघर्षामुळे अखेर सत्याला न्याय मिळाला आहे. आता राधाकृष्ण विखे यांच्यावर राजकीय व नैतिक जबाबदारी येत असल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
79 %
2.4kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!