सोनई (प्रतिनिधी) – वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी सामाजिक कार्याची जोड देत ‘गुरूकृपा बहुउद्देशीय प्रतिष्ठान’चे संस्थापक काशिनाथ कुसळकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बालाजी मंदिर परिसरात ‘वृक्षस्नेह’ दाखवत ५१ वृक्षांची लागवड केली. कृषी विद्यापीठ, राहुरी येथे वाहनचालक पदावरून निवृत्त झालेले काशिनाथ कुसळकर हे सोनई येथील नरेंद्र महाराज यांच्या ट्रस्टमध्ये सेवाकार्यात मग्न असून, सामाजिक जाणिवेतून दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण करत आहेत.
या उपक्रमावेळी सोनईचे उपसरपंच संदीप कुसळकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “वाढदिवस साजरा केलाच पाहिजे, पण तो झाडे लावून साजरा करावा. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. सिमेंटच्या जंगलामुळे तापमानवाढ आणि रस्त्यांवर हिरवळ कमी होत चालली आहे. आपल्या सोनई-शनिशिंगणापूर रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या हजारो वाहनांमुळे वातावरणात वाढणारा कार्बनडायऑक्साइड पर्यावरणास हानी पोहोचवत आहे. त्यामुळे वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे ठरते.” या प्रसंगी काशिनाथ कुसळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लागवड केलेल्या सर्व झाडांची योग्य निगराणी व संवर्धनाची जबाबदारी कुसळकर परिवार घेणार आहे. प्रत्येक झाडाला प्रतिष्ठानच्या वतीने संरक्षण जाळी बसवण्यात आली असून, त्यांची योग्य देखभाल केली जाईल.
कार्यक्रमास सोनईचे ज्येष्ठ पत्रकार अशोक भुसारी, संदीप दरंदले, युवा उद्योजक महेश दरंदले, अमोल कुळकर, रुपेश कुसळकर, संदीप कुसळकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, परिसरातील महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यामध्ये धनश्री कुसळकर, स्मिता कुसळकर, जयश्री दरंदले, वैशाली शेजवळ, मीरा कुसळकर, भागीरथी कुसळकर, रेणुका कुसळकर, मुक्ता कुसळकर, शोभा कुसळकर, शीला कुसळकर, मीना कुसळकर, सुमन कुसळकर, विमल कुसळकर आदी महिलांची विशेष उपस्थिती होती. गुरूकृपा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याची एक नवीन सामाजिक परंपरा रुजवली जात असून, काशिनाथ कुसळकर यांच्या प्रेरणादायी उपक्रमामुळे परिसरात पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचला आहे. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.