नेवासा (प्रतिनिधी) — सामाजिक क्षेत्रात आदर असलेले व गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले देडगाव, ता. नेवासा येथील दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था चालवणारे अध्यक्ष शहादेव दत्तात्रय मुंगसे यांना माजी कर्मचारी आकाश भारत बागुल व जनरक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदर्श हरिशचंद्र साळवे यांनी संस्थेचे कामकाज चालवायचे असल्यास दरमहा हप्ता व एकरकमी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंगसे यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार करून संबंधित आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंगसे हे सन २०१७ पासून दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था चालवित असून, संस्थेच्या माध्यमातून देवस्थान, यात्रा, उत्सव, मेळावे व गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. या कामामध्ये विशेष करून गरीब व बेरोजगार मुलांना सामील करून त्यांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवून संस्थेने एक आदर्श सामाजिक चळवळ उभी केली आहे. त्याचा फायदा परिसरातील अनेक युवकांना झाला असून त्यांचे कुटुंबीयही मुंगसे यांचे ऋणी आहेत.
अलीकडे काही दिवसांपूर्वी माजी कर्मचारी आकाश बागुल यांनी संस्थेतून राजीनामा देऊन संस्थेच्या कामकाजातून स्वतःला वेगळे करून घेतले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांची मुंगसे यांच्यासोबत भेट झाली असता त्यांनी थेट धमकावण्यास सुरुवात केली. बागुल यांनी मुंगसे यांना म्हटले, “तुला संस्थेचे काम चालवायचे असल्यास दरमहा हप्ता द्यावा लागेल आणि एकरकमी तीन लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा आदर्श साळवे यांच्यासोबत मिळून तुझे काम बंद करून टाकू, तुला खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये सडवू!” अशा प्रकारच्या धमकीमुळे मुंगसे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले असून त्यांना स्वतःच्या व संस्थेतील अन्य सदस्यांच्या जीवितास धोका असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार करून आरोपींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
देडगावसारख्या शांत परिसरात सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाला अशा पद्धतीच्या धमक्या मिळाल्याने सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विविध सामाजिक संस्थांनीही मुंगसे यांना पाठिंबा दर्शविला असून, आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून समाजात एक ठोस संदेश देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनामार्फत सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुंगसे यांचे निवेदन स्वीकारले असून तपास यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आरोपींना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल, असेही संकेत दिले आहेत.
गोरगरीबांना मदतीचा हात देणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य करणाऱ्या संस्थांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. अशा धमक्या व खंडणीच्या मागण्या केवळ एखाद्या व्यक्तीच्या स्वाभिमानावरच नव्हे, तर सामाजिक चळवळीच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणा यावर कठोर पावले उचलून दोषींना शिक्षा देईल, अशी जनतेची अपेक्षा आहे. या प्रकरणामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक संस्थांवर होत असलेल्या अन्यायाचा वेळीच बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. मुंगसे यांचे प्रामाणिक सामाजिक कार्य लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी त्वरित कारवाई होऊन आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.