अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी अत्यंत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांमध्ये त्यांनी दिनकर यांच्यावर पदाचे आमिष दाखवून महिलांना बिअर बार व धाब्यावर बोलावल्याचा, तसेच त्यांच्याकडून नाचायला लावल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात नितीन दिनकर काही महिलांसोबत नाचताना दिसत आहेत.
तृप्ती देसाई यांनी याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अशा वर्तन करणाऱ्या व्यक्तींना पक्षात स्थान नसावे. त्यांनी दिनकर यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात काही महिलांनी या संदर्भात तक्रारीही नोंदवल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हे प्रकरण केवळ आरोपांपुरते मर्यादित न राहता कायदेशीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, नितीन दिनकर हे भाजपमधील वरिष्ठ नेते आणि सध्या जलसंपदा मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या विरोधातील हे आरोप पक्षासाठीही अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे जिल्हा भाजपमध्येही अंतर्गत हालचालींना गती मिळाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नितीन दिनकर यांनी या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तृप्ती देसाई यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ हा कोणताही आक्षेपार्ह प्रकार नसून, तो त्यांच्या भाचीच्या वाढदिवसाचा घरगुती कार्यक्रमातील असल्याचे सांगितले. “तो व्हिडिओ माझ्याच इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंटवर मी स्वतः पोस्ट केला होता. कुटुंबीय कार्यक्रमात एक मिनिट डान्स केल्यास त्यात चुकीचे काय?” असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, १४ महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ आता पुढे करून स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी तृप्ती देसाई हे बदनामीचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय, त्यांनी लवकरच तृप्ती देसाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा आणि कायदेशीर तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाची खरी पार्श्वभूमी काय आहे, आरोपात तथ्य किती आहे आणि भाजप पक्षाची अधिकृत भूमिका काय राहते, हे येत्या काळात स्पष्ट होईल. तृप्ती देसाई यांनी महिला सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत दिनकर यांच्यावर हल्ला चढवला आहे, तर दिनकर यांनी तो एक वैयक्तिक कार्यक्रम असल्याचे सांगून सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता या आरोप-प्रत्यारोपाच्या वादात सत्याचा कौल कोणाकडे लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.