अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मुस्लीम समाजाच्या विरोधात बोलणाऱ्या विधानांमुळे वादात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्यावर कारवाईची मागणी करत काही मुस्लिम मौलवींनी मुंबईत जाऊन पक्षाचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी वर्गाने संग्राम जगताप यांना पाठींबा देत त्यांच्यावरील आरोपांचा निषेध करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा आणि सभा आयोजित केली होती. या सभेत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी परखड आणि आक्रमक भाषेत मुस्लीम समाजाच्या राजकीय प्रभावावर टीका करत, संग्राम भैय्यांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. “अजित दादा पवार यांच्याकडे गेलेले मौलवी हे तेच आहेत, ज्यांनी त्यांनाच मतदान केले नाही. हे दादा विसरले नसतील,” असा टोला त्यांनी लगावला.
सभेत सागर बेग म्हणाले, “छत्रपती शिवरायांचं हिंदुत्वाचं स्वप्न जर आपण आजही साकार करू शकत नसलो, तर आपण षंढ आहोत. संग्राम भैय्या यांच्यावर बोलणाऱ्यांना आता दांड्याचीच भाषा समजणार आहे. आणि दांडे त्यांच्या अशा ठिकाणी घाला की पुन्हा ते बोलूच शकणार नाहीत!” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. बेग यांनी पुढे सांगितले की, “मुस्लिम मतांसाठी लोटांगण घालणाऱ्यांनी हिंदूंच्या कार्यक्रमात स्थान नाही. अशा नेत्यांवर बहिष्कार टाका.” त्यांनी वक्फ बोर्ड विधेयकाच्या वेळी जिल्ह्यातील दोन खासदारांनी मुस्लिम खासदारांसह मतदान केल्याचे उदाहरण देत त्यांच्यावर गावबंदी करण्याची मागणी केली.
सागर बेग यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत १६० लवजिहाद आणि धर्मांतरविरोधी मोर्चे काढले आहेत, पण महाराष्ट्रात यावर कठोर कायदे झालेले नाहीत याची खंत व्यक्त केली. इतर राज्यांनी मोर्चे न काढताही कडक कायदे केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही लवजिहाद, धर्मांतरबंदी आणि गोहत्या बंदीवर कठोर कायदे करण्याची मागणी त्यांनी पुन्हा मांडली. काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यामुळे वाल्मिकी समाजाला आपले हिंदू अस्तित्व स्वीकारून अभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला, असा उल्लेखही त्यांनी केला. “मोदींनी काश्मीरमध्ये हिंदूविरोधी ३७० कलम हटवून ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही त्यांच्यामागे ठामपणे उभे आहोत,” असेही ते म्हणाले.
या सभेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट मुसलमानांचे नाव न घेता संग्राम जगताप यांच्या विरोधात एकत्र झालेल्यांना उत्तर देत, “या प्रवाहात येण्यास मला वेळ लागेल, पण मी आता त्या दिशेने येत आहे. आज मी येथे उभा आहे म्हणजे संग्राम भैय्याला पाठिंबा देतो,” असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला समाज प्रबोधनकार कीर्तनकार संग्राम बापू भंडारे, अशोकनाथजी महाराज, मा. खा. डॉ. सुजय विखे, तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.