श्रीरामपुर/प्रतिनिधी :– येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब आसने यांनी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जितेंद्र गदिया यांच्याविरोधात जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची सखोल चौकशी करण्यात आली असून, त्यात गदिया दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विखे गटाच्या पाठबळावर जितेंद्र गदिया यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी निवडणुकीत विजय मिळवून गटाच्या विश्वासाला पात्र ठरले होते. मात्र, सभापती निवडीच्या दिवशी घडलेल्या एका अनपेक्षित घडामोडीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गदिया यांनी आपल्या गटाचे न ऐकता, विरोधी ससाने गटाचे उमेदवार सुधीर नवले यांना मतदान केले. ही बाब विखे गटासाठी अत्यंत अपमानास्पद ठरली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत गदिया यांची यापूर्वी चर्चा देखील झाली होती. त्यात त्यांनी गटाशी निष्ठावान राहण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात मात्र त्यांनी गटाच्या धोरणाविरुद्ध जाऊन मतदान केल्याने गटाच्या रणनीतीला मोठा धक्का बसला.
नानासाहेब आसने यांनी गदिया यांच्या या वर्तनाबाबत योग्य त्या न्यायिक यंत्रणेकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार केवळ राजकीय नाही, तर नैतिक बाब म्हणूनही पुढे आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आणि चौकशीस सुरुवात केली. चौकशीत गदिया यांची कृत्ये अपात्रतेस कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, त्यांना बाजार समिती सदस्यत्वासाठी अपात्र घोषित करण्यात आले. जरी गदिया यांनी ससाने गटाचे उमेदवार सुधीर नवले यांना मतदान करून त्यांना सभापती पद मिळवून दिले, तरी त्यानंतर त्यांच्यावर झालेली कारवाई सत्ताधारी गटासाठीही एका धक्क्यासारखीच ठरली. नवले यांचा सभापती म्हणून झालेला विजय म्हणजे एका अपात्र व्यक्तीच्या मदतीने झालेला विजय असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरही नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना केवळ बाजार समितीपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिचे पडसाद संपूर्ण तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या राजकारणात उमटत आहेत. गटीय राजकारणात निष्ठेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही कारवाई इतर सदस्यांसाठी देखील एक इशारा आहे. गटाच्या धोरणाविरुद्ध जाणे केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे, तर कायदेशीर दृष्ट्याही धोकेदायक ठरू शकते.

जितेंद्र गदिया यांच्या अपात्रतेमुळे विखे गटाला आपली शिस्त व कार्यपद्धती अधिक दृढ करण्याची संधी मिळाली आहे. गटाच्या वतीने सांगण्यात आले की, “गटविरोधी कृती करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येतील. निष्ठावान कार्यकर्त्यांनाच गटात स्थान मिळेल.” संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अधोरेखित होते – राजकारणात निष्ठेचा मोठा मान आहे. पक्ष किंवा गटाने दिलेल्या संधीचा गैरवापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. जितेंद्र गदिया यांच्यासारख्या नेतृत्वावर गटाने विश्वास टाकला, पण त्यांच्या एका निर्णयामुळे त्या गटाची राजकीय दिशा डळमळीत झाली. गदिया यांच्या जागेवर नवीन सदस्याची निवड होणार असून, ही निवडही गटीय राजकारणात नवे समीकरण तयार करेल. ससाने गटाच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे की, त्यांनी एका गटद्रोही व्यक्तीकडून मदत स्वीकारून नैतिकतेचा कितपत आदर राखला? या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विखे गट त्याचे स्थान बळकट करण्यासाठी नव्या रणनीती आखण्याच्या तयारीत आहे, तर सत्ताधारी ससाने गटालाही याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे. जितेंद्र गदिया यांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण राजकीय घडामोडींना कलाटणी मिळाली आहे. हा निर्णय इतर राजकीय कार्यकर्त्यांसाठीही एक धडा आहे की, गटाशी किंवा पक्षाशी गद्दारी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. राजकारणात निष्ठा, विश्वास आणि शिस्त यांचे मोल हेच या घटनाक्रमातून अधोरेखित होते.
चौकट
“या आगोदरही मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत स्पष्टपणे सांगितले होते की, जितेंद्र गदिया यांचे आनंद ट्रेडर्स व वैभव ट्रेडर्स या संस्थांच्या नावावर थकबाकी आहे. सार्वजनिक व्यासपीठावर मी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर सत्य समोर आले आणि योग्य ती कारवाई झाली,” असे ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब आसने यांनी स्पष्ट केले.