श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका वजनदार नेत्याच्या कार्यकर्त्याने एका महिलेशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला व तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित महिला यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शेजारी राहणाऱ्या भैरव भाऊसाहेब कांगुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित महिला घरी एकट्या असताना भैरव कांगुणे याने घरासमोर येऊन तिला आवाज दिला. बाहेर आल्यावर त्याने “तू मला फार आवडते” असे म्हणत तिचा हात पकडला व जबरदस्तीने मिठी मारली. महिलेच्या विरोधानंतर त्याने अश्लील शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली व पळून गेला. घटनेच्या वेळी फिर्यादीची मुलगी व आई दवाखान्यात गेल्या असल्याने त्या घरी एकट्याच होत्या.
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी मुलीच्या मदतीने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर 253/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 74, 352, 351(2) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परी सहाय्यक पोलिस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रविंद्र पवार करत असून पुढील कारवाई सुरु आहे. आरोपीचा नेत्याशी संबंध असल्याने प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.