श्रीरामपूर/प्रतिनिधी – श्रीरामपूर शहर पोलिसांनी केलेली अंमली पदार्थ विरोधातील कारवाई ही संपूर्ण जिल्ह्यासाठी एक मोठे यश ठरले आहे. तब्बल तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एकेचाळीस हजार रुपयांचा अल्प्राझोलम आणि त्याचा कच्चा माल जप्त करत श्रीरामपूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का दिला आहे. ही कारवाई श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात करण्यात आली असून, यात एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी सध्या फरार आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे (श्रीरामपूर विभाग) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर करण्यात आली. 14 मे रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी परिसरात एक टाटा एस छोटा हत्ती टेम्पो (MH 20 BT 0951) अंमली पदार्थांची वाहतूक करत आहे. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून त्यांनी त्वरित श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना आदेश करण्यात आले. देशमुख यांनी तत्काळ एक विशेष पथक तयार करून पंचासह शोधमोहीम सुरू केली.
शोध मोहीमे दरम्यान, दिघी-खंडाळा रोडवर एक क्रिम रंगाचा छोटा हत्ती टेम्पो संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. पोलिसांनी तात्काळ टेम्पो थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपली ओळख मिनीनाथ विष्णु राशीनकर (वय 38, रा. धनगरवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) अशी सांगितली. त्यानंतर पंचासमक्ष गाडीची तपासणी करण्यात आली. गाडीत पांढऱ्या रंगाच्या एकूण 21 गोण्या आढळल्या. यामध्ये 14 गोण्या पांढऱ्या पावडरने तर 7 गोण्या पांढऱ्या स्फटिकांनी भरलेल्या होत्या. या बाबत अधिक चौकशी केली असता चालक राशीनकर याने सांगितले की, स्फटिक हे अल्प्राझोलम औषधाचे असून पावडर ही त्याची कच्ची सामग्री आहे. अधिक खात्री करण्यासाठी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तज्ञांनी सखोल तपासणी केल्यानंतर निष्कर्ष दिला की, स्फटिक हे अल्प्राझोलम नावाच्या अंमली पदार्थाचे आहेत आणि पावडर ही त्याच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी रासायनिक सामग्री आहे.
या कारवाई दरम्यान अल्प्राझोलम क्रिस्टल्स – 69.767 किलोग्रॅम अंदाजे बाजारमूल्य 6,97,67,000 रुपये कच्चा माल (पावडर) – 338.37 किलोग्रॅम – अंदाजे किंमत 6,76,74,000 रुपये वाहतूक करणारा टेम्पो (MH 20 BT 0951) – किंमत 1,00,000 रुपयेअसा एकूण 13,75,41,000 रुपये. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राशीनकर याच्या चौकशीतून समोर आले की, हे अंमली पदार्थ त्याला विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौड, जि. पुणे) याने दिले होते. पोलिसांनी या माहितीच्या आधारे दोघांविरोधात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गु.र.नं. 499/2025 अन्वये कलम 8(क), 22(क), 29 अंतर्गत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मिनीनाथ राशीनकरला अटक करण्यात आली असून, विश्वनाथ शिपणकर सध्या फरार आहे व त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई केवळ एक मोठा अंमली पदार्थ जप्तीचा मुद्दा नसून, संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अल्प्राझोलम हे औषध जरी वैद्यकीय उपयोगासाठी वापरले जात असले, तरी त्याचा गैरवापर व्यसनाधीनता, मानसिक बिघाड, तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे अशा प्रमाणात हे औषध अवैधरित्या साठवले व वाहतूक केले जात असल्याचे उघड होणे हे गंभीर बाब आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोना किशोर औताडे, पोना सोमनाथ मुंडले, पोकॉ संपत बडे, पोकॉ संभाजी खरात, पोकॉ मच्छिंद्र कातखडे, पोकों अमोल पडोळे, पोकॉ अजित पटारे, पोकों अकबर पठाण, पोकॉ आजिनाथ आंधळे, पोकॉ राहुल पौळ, पोकॉ रमेश रोकडे, पोकॉ झिने, सफौ. चालक राजेश सुर्यवंशी, पोकॉ बाळासाहेब गिरी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोकॉ नितीन चव्हाण, पोकों रविंद्र बोडखे, पोकों अमोल नागले, पोकॉ नितीन शिरसाठ, चालक पोकों दिलीप कुऱ्हाडे मपोकॉ अश्वीनी पवार यांनी केली.
श्रीरामपूर शहर पोलिसांची ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या लढ्याचे प्रतीक आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे एक मोठा गुन्हा टळला असून, भविष्यातील अशा प्रकारच्या तस्करीस आळा बसण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कारवायांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही कामगिरी फक्त पोलिस दलाच्या तत्परतेचा आणि संयोजन क्षमतेचा परिणाम नसून, समाजात अंमली पदार्थांविरोधात दृढ निर्धार निर्माण करणारी घटना आहे. या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पोलीस दलाचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.