श्रीरामपूर | प्रतिनिधी :- टिळकनगर इंडस्ट्रीजबाबत विधानभवनात आमदार हेमंत ओगले यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर खळबळ उडाली असून, आता त्यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे या प्रतिक्रियांमध्ये केवळ विरोधकच नव्हे, तर स्वपक्षीय कार्यकर्ते व स्थानिक नागरिकही सामील झाले असून, आमदार ओगले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अलीकडेच विधीमंडळात आमदार ओगले यांनी श्रीरामपूरातील टिळकनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत थेट पाण्याची बाटली दाखवून लक्ष वेधले. मात्र, स्थानिक नागरिकांच्या आणि कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, ही माहिती खातरजमा न करता दिली गेली होती. या विधानामुळे टिळकनगर परिसराची बदनामी झाली असून, तेथील कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे.कामगार संघटनांनी आणि स्थानिक पंचक्रोशीतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत सोशल मीडियावर आमदार ओगले यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.
टिळकनगर इंडस्ट्रीज ही हजारो कुटुंबांची उपजीविका आहे. अशी कंपनी वेठीस धरणे म्हणजे हजारो लोकांचे भवितव्य धोक्यात घालणे होय,” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आमदार ओगले यांनी विशिष्ट काही लोकांच्या एकतर्फी माहितीवर विश्वास ठेवत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप होत आहे. सदर विधानाअगोदर स्थानिक प्रशासनाकडून किंवा पाणीपुरवठा यंत्रणेकडून खात्रीशीर माहिती घेण्यात आली नव्हती, असे दिसून येते. यामुळे त्यांच्या विधानाची विश्वासार्हता तपासली जात असून, त्यांना माफी मागण्याचा दबाव वाढत चालला आहे.
राजकीय वर्तुळात हे प्रकरण चांगलेच गाजत असून, स्वपक्षीय नेत्यांमध्येही यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. काही स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही खासगी चर्चेत आमदार ओगले यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले आहे. या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना आयते कोलीत मिळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, तरुणाई आणि महिला वर्ग सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवर आमदार ओगले यांच्यावर ताशेरे ओढत आहेत. “बेजबाबदार विधान करणारे लोकप्रतिनिधी समाजासाठी घातक आहेत,” अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर आता आमदार हेमंत ओगले यांनी आपले विधान मागे घेत माफी मागावी, अशी जनभावना तीव्र होत असून, ती रोखण्यासाठी लवकरात लवकर सार्वजनिक खुलासा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा, जनतेचा रोष आणखी वाढेल आणि राजकीय परिणाम टाळणे कठीण होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या प्रकरणाची दखल घेतल्याचे समजते. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत आमदार ओगले यांना यासंदर्भात खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच यावर ठोस भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे.